ठाणे महानगरपालिका  Pudhari File
ठाणे

Thane municipal politics : आनंद दिघेंची परंपरा एकनाथ शिंदेनी चालवली

अशी झाली महापौरपदाची बिनविरोध निवड...

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : प्रवीण सोनावणे

महापौर पदासाठी यावेळी आपले नाव निश्चित, मला मनापासून वाटतंय यावेळी महापौर मीच होणार, यांचे नाव चर्चेत, त्यांचे नाव आघाडीवर अशा चर्चा ठाण्याच्या राजकारणात रंगल्या असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र नामनिर्देशन जाहीर होण्याच्या काही वेळ आधीच शर्मिला पिंपळोलकर यांचे नाव जाहीर करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे हे देखील महापौर निवडताना अशाच प्रकारे अचानक नाव जाहीर करत होते. तीच परंपरा एकनाथ शिंदे यांनी राखली असल्याचा प्रत्यय शुक्रवारी नामनिर्देशन पत्र जाहीर करण्यापूर्वी आला.

ठाण्याचा महापौरपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. हे पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यानंतर या पदासाठी जवळपास 7 ते 8 नावांची चर्चा सुरू होती. यामध्ये दर्शना जानकर, विमल भोईर, पद्मा भगत, शर्मिला पिंपळोलकर, आरती गायकवाड, गणेश कांबळे, तसेच इतर नावांची देखील चर्चा होती. मात्र खरी चुरस दर्शना जानकर, विमल भोईर आणि पद्मा भगत यांच्यामध्ये मानली जात होती.

शुक्रवारी महापौर पदासाठी नामनिर्देशन दाखल करण्यासाठी शिवसेना आणि भाजपचे जवळपास सर्वच नगरसेवक उपस्थित होते. महापौर पदासाठी नेमके नामनिर्देशन कोण दाखल करणार? कोणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडणार, याबाबत शेवटपर्यंत कमालीची उत्सुकता होती. त्यामुळे महापौर पदासाठी इच्छुक असणाऱ्या नगरसेवक तसेच त्यांच्या समर्थकांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट जाणवत होता.

खासदार नरेश म्हस्के ठाणे महापालिकेत दाखल झाल्यानंतर नामनिर्देशन दाखल करण्याच्या हालचाली सुरू होतील, अशी चर्चा असताना स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे महापालिकेत उपस्थित राहणार असल्याची चर्चा सुरू झाली. साकेत येथील जैन मंदिराचा कार्यक्रम करून शिंदे हेे महापालिकेत येण्यासाठी निघाले. ठाणे महापालिकेच्या समोरून त्यांच्या गाड्यांचा ताफा जात असताना ते थांबले नाहीत, त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले. मात्र काही क्षणातच ते पुन्हा महापालिकेत दाखल झाले आणि महापौरांच्या नावाची घोषणा करण्याच्या हालचालींना कमालीचा वेग आला.

उपमुख्यमंत्री हे महापौर दालनात बसले, काही वेळ चर्चा केल्यानंतर खा. नरेश म्हस्के यांना त्यांनी नाव जाहीर करण्यास सांगितले आणि नामनिर्देशन दाखल करण्याच्या अवघ्या काही वेळात म्हस्के यांनी शर्मिला पिंपळोलकर यांचे नाव जाहीर करून सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. शर्मिला पिंपळोलकर यांचे नाव जाहीर झाल्याने खऱ्या अर्थाने कोपरीकरांना एकनाथ शिंदे यांनी न्याय मिळवून दिला असल्याची भावना कोपरीकरांमध्ये आहे.

परंपरेला उजाळा मिळाल्याच्या चर्चा

दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांची देखील अशाच पद्धतीने काम करण्याची पद्धत होती. शेवटपर्यंत ते सर्व गोष्टी गुलदस्त्यात ठेवत होते. ज्यांच्या नावाची चर्चा होती त्याऐवजी दुसरेच नाव जाहीर केले जायचे. त्याच परंपरेचा प्रत्यय शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अनुभवायला मिळाला. त्यामुळे महापौर निवडीच्या दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आनंद दिघे यांच्या कार्यपद्धतीला तसेच परंपरेला उजाळा मिळाल्याच्या चर्चा पालिका वर्तुळात ऐकायला मिळाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT