ठाणे : ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले वर्चस्व कायम ठेवत ठाणे हा त्यांचाच बालेकिल्ला असल्याचे सिद्ध केले आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर झालेल्या या निवडणुकीत शिंदेनी आपले 75 शिलेदार निवडून आणले आहेत. तर उबाठा पक्षाने देखील ठाण्यात खाते उघडले आहे. शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती यांचा पराभव करून उबाठाचे उमेदवार शहाजी खुस्पे हे खऱ्या अर्थाने जायंट किलर ठरले आहेत. तर माजी खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे यांचा पराभव झाल्याने उबाठा पक्षासाठी आणि विशेष करून राजन विचारे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
शेवटच्या क्षणी महायुतीमध्ये सामील झालेल्या भाजपने देखील या निवडणुकीमध्ये मोठी ताकद लावली होती. मात्र भाजपला फारसे यश आले नाही. ठाण्यात भाजपचे 28 उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे ठाण्यात महायुतीचा गुलाल उधळला आहे. या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 9 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने 12 जागा जिंकल्या असून मनसेला मात्र या निवडणुकीतही आपले खाते उघडता आलेले नाही. तर एमआयएम पक्षाने या निवडणुकीत चांगली कामगिरी बजावत आपले पाच उमेदवार निवडून आणले आहेत.
शिवसेनेत आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला बालेकिल्ला कायम राखला आहे. ठाणे महापालिकेत शिवसेना आणि भाजपने पहिल्यादांच युतीमध्ये निवडणूक लढवली. यामध्ये शिवसेनेने 91 ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. तर भाजपने 38 ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते.
निवडणुकीपूर्वीच शिवसेनेचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने शिवसेनेचे उर्वरित उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात होते. शिवसेनेचे सर्वाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडकरी रंगायतन या ठिकाणी जाहीर सभा घेत ठाण्याच्या विकासाचा आढावा घेतला होता. अपेक्षेप्रमाणेच या ठिकाणी शिवसेना आणि भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून आल्याने ठाणे महापालिकेत महायुतीचीच सत्ता बसणार हे निश्चित समोर आलेल्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.
या ठिकाणी स्वतः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यात सभा घेतली. मात्र ठाण्यात याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. उबाठाने मात्र प्रभाग क्रमांक 13 मध्ये आपले खाते उघडले असून उबाठाच्या शहाजी खुस्पे यांनी माजी महापौर अशोक वैती यांचा पराभव करून या ठिकाणी विजय मिळवला आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी हा फार मोठा धक्का मानला जात आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 9 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा 12 जागांवर विजय झाला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा देखील पराभव झाल्याने ठाण्यात काँग्रेसला देखील मोठा धक्का बसला आहे. तर गेल्या निवडणुकीत केवळ दोन जागा निवडून आलेल्या एमआयएमने मात्र पाच जागांवर विजय मिळवला असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
ठाणे महानगरपालिका निकाल...
एकूण जागा - 131
प्रभाग - 33
एकूण उमेदवार - 641
पक्षनिहाय निकाल...
शिवसेना (शिंदे) - 75
(लढविलेल्या जागा 79)
भाजप - 28(जागा 38)
राष्ट्रवादी (अजित पवार) - 9 (66)
मनसे - 0 (28)
काँग्रेस - 0 (67)
शिवसेना (उद्धव ठाकरे) - 1 (66)
राष्ट्रवादी (शरद पवार) - 12 (35)
एम आय एम - 5 (12)
अपक्ष - 1
या ठरल्या लक्षवेधी लढती...
माजी महापौर अशोक वैती यांचा उबाठाच्या शहाजी खुस्पेकडून पराभव
शिवसेनेचे मंदार केणी ठाण्यात सर्वाधिक 15156 मताधिक्यांनी विजयी
सेनेचे विक्रांत वायचल यांचा 171 मताच्ा फरकाने विजय
खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे यांचा पराभव
माजी महापौर मीनाक्षी शिंदे विरुद्ध भूषण भोईर यांच्या पॅनलमध्ये टोकाचा संघर्ष
शिवसेनेने तिकीट नाकारलेल्या अपक्ष उमेदवार प्रमिला केणी यांचा
दणदणीत विजय
काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा पराभव
ठाण्यात मनसे, काँग्रेस, यांना खातेही उघडता आले नाही