ठाणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच नगरपरिषद, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्येही शिवसेनेचा स्ट्राइक रेट भक्कम राहिला असून, आम्ही जनतेसमोर विकासाचा अजेंडा घेऊन गेलो. स्थानिक प्रश्नांवर भर दिला आणि कोणावरही टीका केली नाही, त्यामुळेच जनतेने आम्हाला भरभरून यश दिले, असे ठाम मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ठाणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, ‘घरात बसणाऱ्यांना जनतेने घरीच बसवले असून खरी शिवसेना कोणाची हे मतदारांनी या निकालातून स्पष्ट केले आहे.’
राज्यभरात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महायुतीला मोठे यश मिळाले असून, भाजपाने सेंच्युरी करत नंबर एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे, तर शिवसेनेने हाफ सेंच्युरी पार करत नंबर दोनचा पक्ष म्हणून आपली ताकद सिद्ध केली आहे. कमी जागा लढवूनही शिवसेनेने जास्त जागा जिंकत नगराध्यक्ष पदांवर आपला दबदबा निर्माण केला आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांची एकत्रित बेरीजही अनेक ठिकाणी एकट्या शिवसेनेपेक्षा कमी असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.
शिवसेना केवळ ठाणे किंवा मुंबईपुरती मर्यादित असल्याचा आरोप फेटाळून लावत शिंदे म्हणाले की, ‘कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आहे आणि राहील. या निवडणुकांत कोकणासह रायगड, पालघर आणि इतर भागांत शिवसेनेच्या उमेदवारांनी मोठे यश मिळवले असून, कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचा धनुष्यबाण घराघरात पोहोचला आहे.’ या निकालाने शिवसेनेची संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे त्यांनी नमूद केले. जनतेला काम करणारा नेता हवा असतो, विकास आणि मूलभूत सोयीसुविधांना प्राधान्य देणारा पक्ष हवा असतो आणि म्हणूनच मतदारांनी शिवसेनेवर विश्वास दाखवला, असे शिंदे म्हणाले.