KDMC Elections 2025
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात शिवसेना आणि भाजपामधील जागा वाटपाविषयी विविध प्रकारचे आकडे मांडले जात आहेत. मात्र, त्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. जागा वाटपात दोन्ही कडून कमी-जास्त होऊ शकतात. पण कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना- भाजपाची महायुती निश्चित आहे. या महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी रात्री पश्चिम डोंबिवलीतील पंडित दिनदयाळ रोडवर आयोजित केलेल्या विजयी निर्धार मेळाव्यात केले.
या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना लक्ष्य केले. मराठी माणसाचा अजेंडा घेऊन एकत्र आलेल्या मनसे आणि ठाकरे पक्षावर टीका केली. हे मराठी माणसासाठी नाही तर मुंबई ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. त्यामुळे मुंबई शहरातील सत्ता, खुर्चीसाठी स्वार्थी विचाराने हे एकत्र आले आहेत, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सेना आणि मनसे युतीवर केली.
डोंबिवली हिंदुत्वाची विचासरणी असलेली साहित्यिक, सांस्कृतिक नगरी आहे. या शहरात अनेक दिग्गज होऊन गेले आहेत. त्यामुळे डोंबिवली शहराला स्मार्ट सिटी करण्याचा मानस आहे. या शहराचा कायापालट करून सुरक्षित डोंबिवली आपणास साकारायची आहे. ही सर्व स्वप्ने पूर्ण करायची असतील तर पालिकेवर महायुतीचा भगवा पाहिजे, असे शिंदे यांनी सांगितले.
कल्याण-डोंबिवलीतील जागा वाटपाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर चर्चा झाली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या बरोबर बैठका सुरू आहेत. त्यामुळे पालिकेत महायुतीचा निर्णय पक्का आहे, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. ज्यांनी मुंबई विकली, तेच आता मुंबई, इथल्या मराठी माणसाचा कळवळा घेऊन पुढे आला आहे. यांच्यामुळेच मराठी माणूस बदलापूर, डोंबिवली परिसरात फेकला गेला आहे. तोच मराठी माणूस पुन्हा मुंबईत आणण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. त्याला तेथे त्याचा हक्काचा निवारा द्यायचा आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
यापूर्वी डोंबिवलीत पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आलो की रात्रीच्या वेळेत रस्त्यांवर खड्डे दिसायचे. मग त्या ठिकाणी उतरून तात्काळ अधिकारी आणि ठेकेदारांना बोलावून तेथे पेव्हर ब्लॉक, रेडिमिक्स टाकून ते खड्डे बुजविण्याची कामे आम्ही उभे राहून करत होतो. मानपाडा रस्ता असाच आम्ही रात्रीतून उभे राहून करून घेतला होता, असा अनुभव एकनाथ शिंदे यांनी सांगितला.
निवडणुकीच्या काळात डोंबिवली जिमखाना येथे मुक्काम असायचा. त्यावेळी अनेक नागरिक तेथे नागरी समस्या, विकासाचे प्रश्न घेऊन येत होते. त्यांच्या प्रश्नांची दखल पाठपुरावा करून आम्ही घेत होते, असेही शिंदे यांनी सांगितले. डोंबिवलीत अनेक साहित्यिक, कलाकार, गायक, नाट्य कलावंत, पत्रकार होऊन गेले आहेत. त्यांनी डोंबिवली शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यामुळे या शहराचे साहित्यिक, सांस्कृतिकपण टिकविण्यासाठी, जपण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत, असे शिंदे म्हणाले.