Thane MLC election Pudhari
ठाणे

Thane MLC election: शिंदे सेनेचा बविआला राजकीय प्रस्ताव? फाटक-ठाकूर भेटीने राजकीय खळबळ

क्षितिज ठाकूरांना विधान परिषदेची ऑफर दिल्याची चर्चा

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: विधान परिषद निवडणुकीच्या धामधुमीत बहुजन विकास आघाडीसमोर (बविआ) शिवसेनेत विलीन होण्याचा प्रस्ताव ठेवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसमोर नवे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न चालवल्याचे राजकीय हालचालींवरून दिसते.

शिंदे यांची ही चाल यशस्वी झाल्यास ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत विद्यमान आमदार रवींद्र फाटक यांना घरी बसावे लागेल आणि बविआचे क्षितीज ठाकूर शिवसेनेचे उमेदवार असतील, असेही चित्र रंगवले जाऊ लागले आहे.

रवींद्र फाटक यांनी मंगळवारी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर आणि माजी आमदार क्षितिज ठाकूर यांची घेतलेली भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते.

शिवसेनेची नवी रणनीती

ठाणे आणि पालघर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढत असताना शिवसेनेच्या फुटीचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणावर स्पष्टपणे दिसून येत आहे. सध्या भाजपकडे तब्बल 444 नगरसेवकांचे संख्याबळ असून शिवसेनेकडे 346 मते आहेत.

या परिस्थितीत विजयासाठी अतिरिक्त मतांची गरज लक्षात घेऊन शिवसेनेने बहुजन विकास आघाडीला सोबत घेण्याची रणनीती आखल्याचे म्हटले जाते. बहुजन विकास आघाडीकडे सुमारे 71 मतांचे बळ असल्याने हा पाठिंबा निर्णायक ठरू शकतो.

त्यामुळेच शिवसेनेने बविआला राजकीय प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे. ती खरी ठरल्यास परिषद निवडणुकीची सारी समीकरणे पूर्णपणे बदलली जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून क्षितिज ठाकूर यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याच्या बदल्यात तुमच्या बविआ पक्षाला शिवसेनेत विलीन होण्याची ऑफर आली काय? असा थेट प्रश्न पुढारीने बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांना विचारला असता त्यांनी स्पष्ट उत्तर टाळले.

मात्र रवींद्र फाटक हे स्वतःसाठी मदत मागायला आले होते, असे त्यांनी सूचित केले व आपले कार्डस गुप्त राखले. या भेटीमागे कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असे स्वत: फाटक यांनी सांगितले. मात्र त्यांच्या या भेटीने पडद्यामागे मोठ्या राजकीय हालचाली सुरू असल्याचा अंदाज दिला.

ठाणे जिल्हा बँक निवडणुकीतही बविआ ‌‘किंगमेकर‌’?

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

भाजपसोबत जाण्यापेक्षा बविआसोबत आघाडी करण्याचा पर्याय शिवसेनेकडून तपासला जात असल्याचे बोलले जात आहे. सध्या जिल्हा बँकेवर सर्वपक्षीय संचालकांची सत्ता असून अध्यक्षपद बहुजन विकास आघाडीकडे, तर उपाध्यक्षपद भाजपकडे होते. मात्र आगामी निवडणुकीत भाजप बँकेवर पूर्ण ताबा मिळवण्याच्या तयारीत असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.

वेगवेगळ्या निवडणुका आल्या की सर्वच पक्ष माझी मदत घ्यायला येतात. शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक हे पण आज काहीतरी घ्यायला आले होते, द्यायला नाही! मला विधान परिषद आमदार होण्यात स्वारस्य नाही. घोडा मैदान जवळ असून दोन दिवसात निर्णय घेऊ. क्षितिज ठाकूर माझा मुलगा आहे आणि माझे त्याच्यावर प्रेम आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यात आमची ताकद असून, शिवाय दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाचीही आम्हाला साथ आहे.
- हितेंद्र ठाकूर, अध्यक्ष, बहुजन विकास आघाडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT