डोंबिवली : मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात मद्यपी, गर्दुल्ले, नशेखोर प्रवास करत असल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. आतातर चक्क महिलांसाठी वातानुकूलित असलेल्या लोकलच्या डब्यात घुसून एका तर्राट मद्यपीने प्रवास केल्याचा व्हिडियो समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. शुक्रवारी (दि.२७) सकाळी हा प्रकार घडला. दिवसाढवळ्या नशेखोरांचा वावर वाढल्याने महिला प्रवाशांत भितीचे वातावरण पसरले आहे.
डोंबिवलीहून सीएसएमटी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या महिलांच्या वातानुकूलित लोकलच्या डब्यात १० वाजून ३४ मिनिटांनी एक मद्यपी घुसला. डब्यातील महिलांकडे आशाळभूत नजरेने पाहत हा इसम दरवाजात उभा राहून प्रवास करत होता. याच डब्यातून प्रवास करणाऱ्या एका महिलेने त्याचे कृत्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले. त्याला काही महिलांनी उतरण्यास सांगितले. मात्र, तो दुर्लक्ष करत होता. मुंब्रा स्टेशन आल्यानंतर उतरून तो निघून गेला.
रेल्वेच्या मदत क्रमांकावर संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नसल्याचे महिला प्रवाशांनी सांगितले. सायंकाळपर्यंत पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नव्हती. दिवसाढवळ्या महिलांच्या डब्यात नशेखोरांचा वावर वाढल्याने प्रवासी महिलांनी संताप व्यक्त केला आहे. या संदर्भात आरपीएफचे डिव्हिजनल कमिशनर आणि वरिष्ठ अधिकारी असलेल्या ग्रुपमध्ये सकाळीच हा व्हिडिओ टाकला होता. पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पुढे काही दुर्दैवी घटना घडल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून चौकशी केली गेली तर स्वतःची जबाबदारी झटकून नेहमीप्रमाणे महिला प्रवासी जबाबदार असल्याचा अहवाल सादर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ९ जूनच्या प्राथमिक अंदाज अहवालामुळे अशीच शक्यता वाटायला लागल्याची चिंता तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा तथा उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी व्यक्त केली.