सापाड : कल्याण पूर्व परिसरात दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या टेम्पो चालकाच्या प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले आहे. पोलिस कारवाईदरम्यान या टेम्पो चालकाने थेट माजी नगरसेवक महेश गायकवाड यांना मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मद्यधुंद अवस्थेत टेम्पो चालवताना या चालकाने रस्त्यावर गोंधळ माजवला. नागरिकांच्या तक्रारीनंतर ट्रॅफिक पोलिसांनी त्याला आवर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने पोलिस चौकीतच कार्यरत ट्रॅफिक पोलिसांवर लाथा-बुक्क्यांनी हल्ला केला. पोलिसांकडून या मद्यधुंद टेम्पो चालकाला समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र मध्यतूनच टेम्पो चालकाकडून वाहतूक पोलीस चौकीची तोडफोड करत सामानाचे नुकसान केले.
याच दरम्यान टेम्पो चालकाकडून कारवाई न करण्याची मागणी पोलिसांना करण्यात आली माझ्यावर कारवाई केल्यास पोलीस चौकीतच आत्महत्या करेल असा इशारा देखील त्यांनी पोलिसांना दिला. दारूच्या नशेत मानसिक संतुलन बिघडलेल्या अवस्थेत टेम्पो चालकाकडून “माजी नगरसेवक महेश गायकवाड यांना मी मारणारच!” अशी धमकी देत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
या प्रकरणी ट्रॅफिक पोलिसांनी दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, त्याने महेश गायकवाड यांचे नाव घेत मारण्याची धमकी का दिली, याचा तपास पोलीस प्रशासनाने सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेबाबत माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी देखील तत्काळ पोलीस स्टेशनला भेट दिली. त्यांनी संबंधित नशेखोर चालकावर कठोरात कठोर कारवाई व्हावी, तसेच पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांविरुद्धही योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरत असून, नागरिकांकडूनही या नशेखोर चालकावर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दारूच्या नशेत कोणीही कायदा हातात घेत असेल आणि पोलिसांवरच हल्ला करत असेल, तर ही बाब गंभीर आहे. मला दिलेल्या धमकीकडे मी हलक्यात घेणार नाही. पोलिसांनी तातडीने आणि कठोर कारवाई करावी, अशी माझी मागणी आहे.महेश गायकवाड, माजी नगरसेवक