Shahapur Drone Crash on Tree
कसारा: शहापूर तालुक्यातील कसारा जवळील फुगाळे गावातील आघान वाडी गावात एका डोंगरावर आकाशात उडणारा ड्रोन अचानक खाली कोसळला. त्यामुळे डोंगरावर खेळत असणाऱ्या मुलांमध्ये एकच घबराट उडाली होती. आज (दि.१५) दुपारी २ च्या सुमारास आघानवाडीतील मुले डोंगरावर खेळत होती. यावेळी अचानक हवेत घिरट्या घालणारे ड्रोन मोठा आवाज करीत एका झाडावर पडले.
मुलांना या ड्रोन बाबत कुतूहल वाटल्याने त्यांनी विमान पडले, विमान पडले, असा आक्रोश करीत झाडावर पडलेले विमान त्यांनी खाली उतरवून डोंगराच्या खाली वस्ती जवळ आणले. गावाचे सरपंच जिवा भला यांनी याबाबत तत्काळ कसारा पोलीस ठाण्याशी संपर्क करून त्यांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक सुरेश गावीत यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान हा ड्रोन एका सर्व्हे कंपनी चा असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. जलसंपदा विभागाचा वाडा तालुक्यात एका धरणाचा सर्व्हे सुरु होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पायोनियर इन्फ्रा कंपनीने ड्रोन च्या मदतीने सर्व्हे सुरु केला होता. ड्रोनची दिशा भरकटल्याने झाडावर कोसळल्याचे कंपनीने पोलिसांना सांगितले.
या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरेश गावीत पुढील तपास करीत आहेत.