डोंबिवली: डॉक्टर रुग्ण सेवा करतात, त्यांच्यावर हात उचलणे चुकीचेच आहे. डॉक्टरांवरील हल्ले कोणत्याही परिस्थितीत योग्य ठरू शकत नाहीत, अशी ठाम भूमिका डॉ. सृष्टी यांचे वडील डॉ. महेंद्र बाविस्कर यांनी बोलताना मांडली. रमेश म्हात्रे यांना जामीन मिळाल्यानंतर मारहाण झालेल्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सृष्टी बाविस्कर यांच्या वडिलांनी ही प्रतिक्रिया दिली.
कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉ. सृष्टी बाविस्कर यांना झालेल्या मारहाणीप्रकरणी आरोपी आणि शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
या निर्णयानंतर प्रथमच डॉ. सृष्टीचे वडील डॉ. महेंद्र बाविस्कर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. त्यांनी सांगितले की, न्यायालयाने कायद्यावर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांना दिलासा दिला आहे. अशा प्रकारच्या घटनांना आळा बसण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल. डॉक्टरांवरील हल्ले कोणत्याही परिस्थितीत योग्य ठरू शकत नाहीत, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
डॉ. महेंद्र बाविस्कर म्हणाले, डॉक्टर हा समाजातील अत्यावश्यक घटक असून ते गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येक रुग्णावर समान निष्ठेने उपचार करतात. त्यामुळे डॉक्टरांवर होणारे हल्ले ही केवळ एका व्यक्तीवरील हिंसा नसून संपूर्ण आरोग्य
व्यवस्थेवरील आघात आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी शासन/प्रशासन आणि समाजाने एकत्रितपणे जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. रुग्णालयात डॉक्टरांना सुरक्षित वातावरण मिळाल्यासच ते निर्भयपणे सेवा देऊ शकतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करून आवश्यक संरक्षण दिल्याबद्दल डॉ. महेंद्र बाविस्कर यांनी पोलिसांचे आभार मानले.
भविष्यामध्ये सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई झाल्यास अशा घटनांमध्ये निश्चितच घट होईल,असा विश्वासही डॉ. बाविस्कर यांनी व्यक्त केला.
रुग्णालयांतील सुविधा वाढवून डॉक्टरांची भरती करा
दरम्यान रुग्णालयातील डॉक्टरांवर दबाव आणण्याऐवजी आरोग्य सुविधांच्या उभारणीसाठी काम करावे, असाही सल्ला डॉ. महेंद्र बाविस्कर यांनी दिला. केडीएमसीच्या रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची कमतरता, अपुऱ्या सुविधा आणि वाढता रुग्णभार ही मोठी समस्या असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
अधिक डॉक्टरांची भरती, आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास सर्वसामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही, असे ते म्हणाले. लोकप्रतिनिधींनी आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीसाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले.
डॉ. महेंद्र बाविस्कर म्हणाले, मारहाणीच्या घटनेनंतर आरोपी रमेश म्हात्रे किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणताही संपर्क साधण्यात आलेला नाही. उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताना घातलेल्या अटींचे डॉ. बाविस्कर यांनी स्वागत केले.
डॉ. सृष्टी पुन्हा सेवेत दाखल होणार?
डॉ. सृष्टी पुन्हा शास्त्रीनगर रुग्णालयात रुजू होणार का? या प्रश्नावर डॉ. महेंद्र बाविस्कर यांनी सावध प्रतिक्रिया दिली.
त्यांनी सांगितले की, सध्या सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्णालयातील वातावरण पूर्ववत होणे आणि डॉक्टरांना सुरक्षिततेची हमी मिळणे आवश्यक आहे.
तणाव निवळून परिस्थिती सामान्य झाल्यानंतर आणि मानसिक तणाव कमी झाल्यावर डॉ. सृष्टी पुन्हा वैद्यकीय सेवेत रुजू होऊ शकतात. या संपूर्ण घटनेतून बाहेर पडण्यासाठी काही काळ लागेल. मात्र, डॉक्टर म्हणून समाजसेवा करण्याची त्यांची भावना कायम असल्याचेही डॉ. बाविस्कर यांनी स्पष्ट केले. दरम्यान डॉक्टरांवरील हल्ले रोखयासाठी सरकार, शासन/प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचासंदेश यावेळी डॉ. बावीस्कर यांनी दिला.