Yash Mahajan Air Force Selection Pudhari
ठाणे

Yash Mahajan Air Force Selection: डोंबिवलीच्या यश महाजनची पहिल्याच प्रयत्नात भरारी; भारतीय वायुसेनेत फ्लाईंग ऑफिसर

एचएएलच्या अप्रेंटिशिपपासून एसएसबीच्या अग्निदिव्यापर्यंत झेप

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली: इंजिनिअरिंग, एचएएलमधील अप्रेंटिशिप आणि एका वर्षाची जिद्दीने केलेली तयारी, याच्या जोरावर डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील यश प्रविण महाजन याने भारतीय वायुसेनेची वर्ग-एक अधिकारी होण्याची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली आहे. वायुसेनेतील तांत्रिक शाखेमध्ये फ्लाईंग ऑफिसर म्हणून निवड झाल्याने कोमल सोसायटीत राहणाऱ्या यशने डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

यशचे शालेय शिक्षण डोंबिवली एमआयडीसीतील सिस्टर निवेदिता इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये झाले. इयत्ता चौथी आणि सातवीमध्ये त्याने शिष्यवृत्ती मिळवली होती. एचएससी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन त्याने मुंबईच्या वर्सोवा येथील राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून इंजिनिअरिंगची पदवी उत्तम गुणांनी पूर्ण केली.

लहानपणापासूनच असलेल्या यशला इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला नाशिक येथील एचएएल (हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड) मध्ये अप्रेंटिशिपची संधी मिळाली. तिथेच त्याने वायुसेनेत अधिकारी होण्याचा निश्चय पक्का केला. पदवी पूर्ण झाल्यावर त्याने ठाण्यातील शत्रुजीत अकॅडमीमध्ये एक वर्षाचा कोर्स पूर्ण करून तयारी केली.

वायुसेनेत वर्ग-एक ऑफिसर होण्यासाठी एएफकॅट (एअर फोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट) ही पूर्व परीक्षा द्यावी लागते. या वर्षी संपूर्ण भारतातून लाखो विद्यार्थी बसले होते आणि एकूण अवघ्या २१८ जागा होत्या. यशने ही परीक्षा उत्तीर्ण केली.

त्यानंतर एसएसबी (सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड) ची पाच दिवसांची अत्यंत कठीण परीक्षा, ज्यात निर्णय क्षमता, मानसशास्त्रीय चाचणी, संभाषण, शारीरिक क्षमता, सामान्य ज्ञान व मुलाखत असते, तीही तो उत्तीर्ण झाला. सर्वात शेवटी कठीण वैद्यकीय चाचणीत पात्र ठरून, गुणवत्ता यादीत स्थान मिळवत त्याने हे यश संपादन केले.

ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यास नऊ ते दहा महिने लागतात. यशचे वडील प्रविण महाजन यांचे डोंबिवलीत ट्रॅव्हल कंपनीचे कार्यालय आहे, तर आई भूमिका महाजन या पश्चिम डोंबिवलीतील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. मुलाच्या यशाने महाजन कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

यशला हवाई दल अकॅडमीत दीड वर्षांचे खडतर शारीरिक, मानसिक आणि तांत्रिक प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल. सुरूवातीचे सहा महिन्यांचे प्रशिक्षण २९ जूनपासून हैदराबाद येथे सुरू होणार आहे. त्यानंतर एक वर्षाचे तांत्रिक प्रशिक्षण बंगळुरू येथे होणार असून, तिथे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्याला एरोनॉटिकल इंजिनिअर म्हणून पदवी मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT