गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारी स्वप्नील डांगरेकर यांच्या हस्ते आमदार रविंद्र चव्हाण यांच्या सुविद्य पत्नी सुहासी चव्हाण यांनी वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र आणि पदक स्वीकारताना Pudhari
ठाणे

Women's Day 2026 | महिला दिनी डोंबिवलीत विश्वविक्रमाची नोंद: ९ हजार १११ विद्यार्थीनींनी रचला सामूहिक लेझिम वादनाचा इतिहास

Dombivli World Record | 'डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवारा'सह भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने देदीप्यमान सोहळा संपन्न

पुढारी वृत्तसेवा

Dombivli 9111 girls Lezhim world record

डोंबिवली : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागातील ९ हजार १११ महिलांसह विद्यार्थीनींनी एकत्र येऊन सामूहिक लेझीम वादन केले. वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या नारी शक्तीने डोंबिवलीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला आहे.

डोंबिवलीचे आमदार तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीकर...एक सांस्कृतिक परिवार आणि कल्याण तालुका शारीरिक शिक्षण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक लेझीम वादन उपक्रम आयोजित करण्यात आला होता. रविवारी (दि.८) हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील विस्तीर्ण पटांगणावर तालुक्यातील शेकडो शाळांच्या विद्यार्थीनी आणि महिलांनी एकत्र येत ९ हजार १११ इतक्या मोठ्या संख्येने सामूहिकपणे लेझीम वादनाचा वर्ल्ड रेकॉर्ड केला.

यापूर्वी सांगलीकरांच्या नावाने हा रेकॉर्ड होता, अशी माहिती गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे लंडनहून आलेले अधिकारी स्वप्नील डांगरेकर यांनी उपस्थितांशी संवाद साधताना दिली. या आधी सांगलीमध्ये ७ हजार ३३८ महिलांनी एकत्र येऊन रेकॉर्ड केला होता. मात्र हा रेकॉर्ड रविवारी डोंबिवलीत मोडण्यात आल्याचे डांगरेकर यांनी जाहीर केले. साडेपाच मिनिटांची विविध प्रात्यक्षिक सादर करून महिलांनी हा रेकॉर्ड केला.

यावेळी डांगरेकर यांनी आमदार रविंद्र चव्हाण यांच्या सुविद्य पत्नी सुहासी चव्हाण यांच्याकडे वर्ल्ड रेकॉर्ड झाल्याचे प्रमाणपत्र आणि पदक हस्तांतरीत करण्यात आले. वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कल्याण तालुका शारीरिक शिक्षण समितीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी आभार मानत उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थीनींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळीं सारा परिसर भारत माता की जय...जय श्रीराम...वंदे मातरम्...ने दणाणून सोडला होता.

वर्ल्ड रेकॉर्ड भारत मातेच्या चरणी अर्पण - रविंद्र चव्हाण

लेझीम ही आपली संस्कृती असून ती टिकवणे हे आपले काम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या वर्षी शारीरिक व्यायामावर भर देऊन जगासमोर सशक्त भारत कसा असू शकतो हे दाखवून देण्याचा संकल्प सोडला होता, त्या निमित्ताने महिला, विद्यार्थीनी आदींनी एकत्र येऊन हा अनोखा रेकॉर्ड केला याचा मला डोंबिवलीकर म्हणून प्रचंड आनंद आहे, हा रेकॉर्ड मी भारत मातेच्या चरणी समर्पित करतो असे उद्गार काढत आमदार रविंद्र चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.

विश्वविक्रमाच्या नोंदीचा साक्षीदार होण्यासाठी...

प्रत्येक जणीच्या चेहऱ्यावर वर्ल्ड रेकॉर्ड केल्याचा आनंद ओसंडून वहात होता. लेझीमचा झंकार सर्वत्र निनादत होता. ढोल-ताशांच्या गजरात त्या रेकॉर्डचे उपस्थित हजारो डोंबिवलीकरांनी टाळ्यांच्या कडकडाटात जंगी स्वागत केले. प्रत्येकाच्या सहभागाबद्दल आयोजकांकडून कौतुक करण्यात आले. डोळ्यांचे पारणे फेडणारा नजारा पाहण्यासह अशा दैदिप्यमान सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी डोंबिवलीकर पहाटेपासून प्रतीक्षेत होता. अखेर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारी स्वप्नील डांगरेकर यांनी वर्ल्ड रेकॉर्डची घोषणा करताच उपस्थित साऱ्यांनी प्रचंड जल्लोषात आनंद व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT