डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेकडे असलेल्या महात्मा फुले रस्त्यावरील रिक्षा स्टँडच्या पुढाऱ्यांनी राज्याचा परिवहन विभाग आणि कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभाग यांना न जुमानता मनमानी करून पाच रुपये भाडेवाढ केली असून दोन दिवसांपासून या संघटनेचे रिक्षा चालक प्रवाशांकडून जबरदस्तीने वाढीव भाडे वसूल करत आहेत.
नियमबाह्य पद्धतीने पाच रुपये जादा भाडे आकारणाऱ्या अशा रिक्षा चालकांवर मंगळवारी रात्री उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांच्या आदेशावरून २० मोटार वाहन निरीक्षकांच्या पथकाने १८ रिक्षा चालकांवर वाढीव भाड्यासंदर्भात कारवाई केली, त्यांच्याकडून ४७ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
पश्चिम डोंबिवलीतील महात्मा फुले रस्त्यावरील रिक्षाचालक वाढीव भाडे आकारत असल्याच्या वाढत्या तक्रारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांच्याकडे परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर प्राप्त होत होत्या. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांच्या २० जणांचे पथक मंगळवारी रात्री पश्चिम डोंबिवलीत दाखल झाले.
या पथकाने महात्मा फुले रस्त्यावरील रिक्षा स्टँडवर न जाता रिक्षा चालकांना अंधारात ठेवून या रिक्षा स्टँडवरील प्रवासी ज्या ठिकाणी उतरतात त्या शेवटच्या, मधल्या थांब्यावर उतरणाऱ्या प्रवाशांना आपण किती भाडे रिक्षा चालकाला दिले? याची माहिती घेतली.
बहुतांशी प्रवाशांनी आम्ही २० रुपये भाडे दिल्याचे पथकातील अधिकाऱ्यांना सांगताच अधिकाऱ्यांनी या रिक्षा चालकांना आपण कोणाच्या आदेशाने हे वाढीव भाडे आकारत आहात अशी विचारणा केली, असा प्रश्न विचारला. अधिकाऱ्यांच्या या प्रश्नावर रिक्षा चालक निरुत्तर झाले. अशा प्रकारे एकूण ५० हून अधिक रिक्षा परिवहनच्या पथकाने तपासल्या. यातील १८ रिक्षा चालकांनी वाढीव भाडे घेतल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पथकाने नवापाडा, गरीबाचापाडा, गणेशनगर, अनमोलनगरी अशा शेवटच्या रिक्षा स्टँडवर जाऊन ही कारवाई केली. या कारवाईमुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. शासनाने रिक्षा भाडेवाढ केली असेल तर आम्ही ती जरूर देऊ, पण महात्मा फुले रस्त्यावरील काही ठराविक रिक्षा चालक वाढीव पाच रुपये जबरदस्तीने उकळत आहेत, त्याला आमचा विरोध असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
मंगळवारी रात्री उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने डोंबिवलीतील रिक्षा चालकांवर वाढीव भाडे आकारणीवरून कारवाई केली असताना सुद्धा बुधवारी सकाळी त्याच महात्मा फुले रस्त्यावरील काही रिक्षा चालक मनमानी करून प्रवाशांकडून वाढीव भाडे आकारत होते. यामध्ये गोपीनाथ चौक ते डोंबिवली रेल्वे स्थानक आणि डोंबिवली रेल्वे स्थानक ते गोपीनाथ चौक प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांनी प्रवाशांना वाढीव भाडे आकारल्याच्या तक्रारी आरटीओच्या ऑनलाईन संकेतस्थळावर करण्यात आल्या आहेत.
ऑनलाईन तक्रारीचे आवाहन
कुणी वाढीव पाच रुपये आगाऊ भाडे आकारत असेल तर प्रवाशांनी थेट आरटीओच्या ऑनलाईन संकेतस्थळावर तक्रारी कराव्यात, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी केले आहे. पश्चिम डोंबिवलीत प्रवाशांकडून वाढीव भाडे आकारणाऱ्या एका रिक्षा संघटनेच्या निर्णयामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, हा विचार करून विष्णूनगर पोलिसांनी या वाढीव भाडेवाढीची दखल घेऊन ही भाडेवाढ करणाऱ्या रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात चर्चेसाठी बोलविले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. कुणीही रिक्षा चालकाने नियमबाह्यपणे प्रवाशांकडून वाढीव भाडे आकारू नये, तक्रारी प्राप्त होताच अशा रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी या पार्श्वभूमीवर दिला आहे.