डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवार आत्तापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून दारोदार फिरताना दिसू लागले आहेत. मात्र पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात निष्काम ठरले आहेत. आजदे गावासह निवासी विभागात पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष जाणवत असल्याने या परिसरातील मतदार निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याच्या मनःस्थितीत तर आहेच, शिवाय दारावर येणाऱ्या उमेदवारांना हुसकावून लावण्यासाठी एकमत करणार आहेत.
डोंबिवलीला जोडून असलेल्या आजदे गावातील जयराम स्मृती इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात नाकाम ठरलेल्या संबंधित विभागाचा चोहोबाजूंनी निषेध व्यक्त करण्यात येत असतानाच एमआयडीसीच्या निवासी विभागामध्ये पाण्याचा ठणाणा झाला आहे. निवासी विभागामध्ये पुन्हा पाण्याचा तुडवडा भासू लागला आहे. मध्यंतरी पाण्यासाठी एमआयडीसीच्या कार्यालयात जाऊन रहिवाशांनी गाऱ्हाणे मांडले असता अधिकाऱ्यांनी पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. मात्र थोड्याच दिवसांनी येरे माझ्या मागल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने रहिवाशांमध्ये पाण्यासाठी प्रचंड चीड निर्माण झाली आहे.
एमआयडीसीच्या निवासी विभागासह आजूबाजूचा ग्रामीण परिसरातील पाण्याविषयी ज्वलंत प्रश्न निर्माण झाला आहे. 7 नोव्हेंबरला भयंकर प्रकार घडला. घरामध्ये पाण्याचा थेंबही येत नसल्याने 76 वर्षीय काशिनाथ सोनावणे यांच्या सहनशीलतेचा बांध फुटल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. वॉकरचा आधार घेत इमारतीचा गच्चीवरून ते जीवन संपवण्याच्या करण्याचा प्रयत्नात होते.
हे पाहून रहिवाशांनी धाव घेऊन काशीनाथ यांना जीवन संपवण्यापासून परावृत्त केले. या घटनेनंतर संतप्त रहिवाशांनी डोंबिवली एमआयडीसीच्या कार्यालयात घुसून तेथील अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. उपस्थित आमदार राजेश मोरे यांनी त्वरित पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानुसार दुसऱ्या दिवसापासून पाणी पुरवठा जास्त दाबाने येण्यास सुरुवात झाली होती. मात्र तरीही त्याचा काहीच उपयोग झाला नसून पाण्याची समस्या जैसे-थेच अससल्याचे त्रस्त रहिवाशांनी सांगितले.
मतदान करणार... पण नोटाला
गेल्या चार दिवसांपासून पुन्हा पाण्याचा दाब कमी झाला आहे. तेही ठराविक वेळेत येत असल्याने पाण्याचा प्रचंड तुडवडा भासत आहे. नळाला पाणी येत नसल्याने गृहिणी वैतागल्या आहेत. येणाऱ्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना याचा जाब विचारून मतदान कुणाला करायचे? की नोटाला करायचे? हे आम्ही ठरविणार असल्याचे रहिवासी नैराश्याने बोलू लागले आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीत पाणी प्रश्न पेटणार हे दिसत आहे.
टँकर लॉबी जोमात...
कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करणाऱ्यांशी संबंधित टँकर लॉबीला सद्या अच्छे दिन आले आहेत. एका इमारत वजा कॉम्प्लेक्ससाठी लागणाऱ्या पाण्याच्या टँकरचे बिल लाखोंच्या घरात जात आहे. प्रत्येक घरटी 509 ते 600 रुपये टँकर लॉबीकडून उकळले जात आहे. परिणामी टँकर माफिया जोमात आणि सर्वसामान्य कोमात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
एमआयडीसीच्या निवासी विभागातील सोसायटी/बंगले, तसेच ग्रामीण परिसरात पुन्हा पाण्याचा प्रश्न जटील झाला आहे. निवासी विभागातील सुदामानगरमध्ये असलेल्या नवसंकुल सोसायटीतील रहिवाशांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने सुदेश बेर्डे यांनी उदिग्न होऊन चीड व्यक्त केली आहे. धरणात भरपूर पाणी असूनही आणि चांगला पाऊस पडला असतानाही तळटाक्यांत पाण्याचा थेंबही पडत नाही.
मिलापनगरमधील बंगल्यात राहणारे राजीव देशपांडे यांनीही संताप व्यक्त करून एमआयडीसी आणि राजकारण्यांना दोषी ठरवले आहे. निवासी विभागात पाण्यासह गटारे/नाले, स्वच्छता, भूमिगत सांडपाणी वाहिन्या, धोकदायक इमारती/रिडेव्हलपमेंट, विद्युत पुरवठा, आदी अनेक प्रश्न सोडविण्यात शासन/प्रशासनासह लोकप्रतिनिधी निष्काम ठरले आहेत. या समस्यांचा निपटारा लवकरच व्हायला हवा, अशी अपेक्षा रहिवासी व्यक्त करत असल्याचे या भागातील जागरूक रहिवासी राजू नलावडे यांनी सांगितले.