Dombivli Family Dispute Crime
डोंबिवली : मामासोबत झालेल्या वादाच्या रागातून एका मूकबधिर तरूणाने आपल्याच आत्याच्या १ वर्षीय मुलाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन सकट नावाच्या तरूणाने रागाच्या भरात हे कृत्य केले.
बाळाला कुर्ल्यातून डोंबिवलीत आणून वाहनांच्या पार्किंगमध्ये सोडून तो पसार झाला. मात्र जागरूक नेटकऱ्यांच्या मदतीमुळे हे बाळ सुरक्षित असून लवकरच ते त्याच्या आईच्या कुशीत विसावणार आहे.
डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिस गस्तीवर असताना त्यांना सार्वजनिक वाहनांच्या पार्किंगमध्ये एक वर्षीय बालक एकटे असल्याचे आढळून आले. त्याच्या माता-पित्याचा-पालकांचा पोलिसांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला. मात्र या बाळावर दावा सागणारे कुणीही पुढे आले नाही. कुणीतरी बाळाला एकट्याला सोडून निघून गेले असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी तातडीने बाळाचा फोटो आणि माहिती व्हॉट्स ॲपसह समाज माध्यमांवर प्रसारित केली.
बाळाचा फोटो आणि त्याची माहिती मजल दरमजल करत मुंबईत पोहोचली. हे बाळ कुर्ल्यातील विनोबा भावे पोलिस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झाल्याचे समोर झाले. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात बाळाचे अपहरण झाल्याचे उघकीस आले. या प्रकरणाचा पुढील तपास विनोबा भावे पोलिस ठाणे करत आहे.
समाज माध्यमांद्वारे बाळाची ओळख पटवून त्याला कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्याची प्रक्रिया सध्या सुरू करण्यात आली आहे. पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि समाज माध्यमांवरील जागरूक नेटकऱ्यांच्या मदतीमुळे चिमुकला सुखरूपपणे कुटुंबीयांपर्यंत पोहोचणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
अमन याने स्वतःच्या आत्याच्या बाळाचे अपहरण का केले ? मामाशी त्याचा कोणत्या कारणावरून वाद झाला होता ? या वादाचा राग चिमुरड्या बाळावर काढण्यामागचे निश्चित कारण काय असावे ? या साऱ्या प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी तपास चक्रांना वेग दिला आहे.
लग्न मोडल्याचा सूड !
लग्नाला विरोध करून सोयरिक मोडल्याच्या रागातून अमन सकट या मूकबधिर भाच्याने मामाच्या एक वर्षाच्या बाळाचे अपहरण केल्याचे उघडकीस आले आहे. कुर्ल्यातून पळवून डोंबिवलीत आणलेल्या या बाळाला पश्चिमेकडील पार्कींगमध्ये असलेल्या एका बंद रिक्षात सोडून तो फरार झाला. मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे बाळ सुखरूपपणे सापडले. या बाळाची केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला त्याचे वडील श्यामसुंदर कांबळे आणि त्याच्या आईकडे सुपूर्द करण्यात आल्याचे डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे यांनी सांगितले.
१५० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
मुंबईतील कुर्ला परिसरातून एक वर्षाचे बाळ अचानक बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. विनोबा भावे पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. परिसरातील १५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पडताळणी करण्यात आली. या फुटेजच्या आधारे बाळाला घेऊन जाणारा तरूण हा बाळाच्या मामा श्यामसुंदर कांबळे यांचा मूकबधिर भाचा अमन सकट असल्याचे स्पष्ट झाले. फरार असलेल्या अमन सकटचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहेत.