डोंबिवली : वाहन चोरीच्या गुन्ह्यातील क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने ठाणे, नवी मुंबई आणि ग्रामीण भागात धुमाकूळ घालणाऱ्या दोघा सराईत वाहन चोरांना जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. क्राईम ब्रँचने केलेल्या या कारवाईत ११ लाख ४० हजार रुपये किंमतीच्या २१ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून १५ गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये बेसुमार वाढ झाली असल्याने जिल्ह्याचे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव व सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांनी गुन्हेगारांवर कारवाईचे फार्मन सोडले होते. या पार्श्वभूमीवर क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, पोलीस निरीक्षक महेश काळे, सपोनि सर्जेराव पाटील, सपोनि गणेश दळवी, पोलीस उपनिरीक्षक किरण भिसे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली टीमने तपास चक्रांना वेग दिला.
कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यातील तपासादरम्यान क्राईम ब्रँचला खासगी गुप्तहेरांकडून पक्की माहिती मिळाली होती. त्यानुसार क्राईम ब्रँचने सापळा रचून सरवर सैय्यद (४२) आणि गाझी जाफरी (२८, दोघेही रा. आंबिवली) यांना ताब्यात घेतले. या दोघांवर डायघर पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल आहे.
कसून चौकशी केली असता या दोघांनी ठाणे शहर, मुंबई, पालघर, ग्रामीण आणि नांदेड जिल्ह्यातून तब्बल २१ दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी खडकपाडा, महात्मा फुले चौक, डोंबिवली, मुंब्रा, मध्यवर्ती, नारपोली, कापुरबावडी, कल्याण तालुका, वाडा, कस्तुरबा आणि लोहा पोलीस ठाण्यातील १५ गुन्हे क्राईम ब्रँचने उघडकीस आणले आहेत, तर ६ दुचाक्या बेवारस मिळाल्या आहेत.
तपासादरम्यान हे दोन्ही आरोपी सराईत असल्याचे उघड झाले आहे. यातील सरवर विरोधात ३०, तर जाफरीवर ३७ असे दोघांवर मिळून ६७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. ज्यात चोरी, जबरी चोरी, चेन स्नॅचिंग, पोलीस असल्याची बतावणी करून लूट, पोलिसांवर हल्ला, मोक्का यासारख्या गुन्ह्यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.