ठाणे

Dombivli Vegetable Storage: डोंबिवलीत धक्कादायक प्रकार! स्वच्छतागृहात साठवला जातो भाजीपाला; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

केडीएमसी कारवाईपासून बचावासाठी फेरीवाल्यांची नवी शक्कल; जप्ती कारवाईनंतर उघड झाला प्रकार

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : केडीएमसीच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी फेरीवाल्यांनी नवा शक्कल लढवत सार्वजनिक स्वच्छतागृहांचाच फळे व भाजीपाल्याच्या साठवणुकीसाठी वापर सुरू केल्याचा किळसवाणा प्रकार डोंबिवलीत उघडकीस आला आहे.

डोंबिवली पूर्वेकडील रेल्वे परिसरात असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहात तसेच त्याच्या मागील उघड्यावर असलेल्या जागेत फळे-भाजीपाला साठवून ठेवला जात असल्याचे आढळून आले आहे. केडीएमसीच्या फ आणि ग प्रभागांतर्गत १५० मीटर परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाईची मोहीम सुरू असल्याने, रेल्वे स्टेशन परिसरात चोरून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांनी आपला माल लपवण्यासाठी स्वच्छतागृहाचा वापर सुरू केला आहे.

केडीएमसीचे पथक निघून गेल्यानंतर हेच फेरीवाले स्वच्छतागृहात लपवलेला माल पुन्हा बाहेर काढून रस्त्यावर विक्रीस ठेवत असल्याचे निदर्शनास आले आहे. स्वच्छतागृहासारख्या अस्वच्छ ठिकाणी ठेवलेला भाजीपाला व फळे नागरिकांना विकली जात असल्याने, अशा फेरीवाल्यांकडून कोणताही माल खरेदी करू नये, असे आवाहन केडीएमसीकडून करण्यात आले आहे.

डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर परिसर फेरीवाला-मुक्त करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी माजी आमदार तथा मनसे नेते राजू पाटील यांनी पोलिस व प्रशासनाकडे केली आहे.

एकीकडे केडीएमसीकडून अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईची मोहीम राबवली जात असताना, दुसरीकडे पोलिसांनीही उन्मत्त फेरीवाल्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू केली आहे. डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरातील फुटपाथ व रस्ते व्यापून व्यवसाय करणारे अनेक फेरीवाले हे मुंब्रा, मस्जिद बंदर, भायखळा, अंधेरी आदी भागांतील असून त्यापैकी काही परप्रांतीय असल्याचेही समोर आले आहे.

फेरीवाल्यांकडून ग्राहकांच्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. अधिक नफा कमावण्यासाठी भाजीपाला व फळे लपवून ठेवण्यासाठी स्वच्छतागृहाचा वापर केला जात असल्याचा प्रकार धक्कादायक आहे.

फ आणि ग प्रभाग क्षेत्रात येणाऱ्या या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून फेरीवाला हटाव मोहीम सुरू आहे. उपायुक्त प्रसाद बोरकर, ग प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार आणि फ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई राबवली जात आहे.

कारवाईदरम्यान आपला माल जप्त होऊ नये म्हणून अनेक फेरीवाले सार्वजनिक स्वच्छतागृह आणि त्याच्या मागील उघड्यावरच्या जागेत भाजीपाला व फळे लपवून ठेवतात. पथक निघून गेल्यानंतर रात्री किंवा संधी साधून हा माल पुन्हा विक्रीस आणला जातो.

भाजीपाला आणि फळे ताजी असल्याचे भासवण्यासाठी त्यावर पाणी शिंपडले जाते. रेल्वे प्रवासानंतर आलेल्या ग्राहकांना ही फळे व भाजीपाला ताजे असल्याचे वाटून ते खरेदी करतात. मात्र हा माल स्वच्छतागृहाजवळ साठवलेला असल्याचे त्यांच्या लक्षात येत नाही. तसेच या फळे-भाज्यांवर अस्वच्छ पाण्याचा वापर केला जात असल्याने आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

दरम्यान, मंगळवार ते बुधवार दरम्यान केडीएमसीच्या फ आणि ग प्रभागातील पथकांनी रेल्वे हद्दीतील स्वच्छतागृह आणि त्यामागील उघड्या जागेत ठेवलेला भाजीपाला, फळे व इतर साहित्य जप्त केले. यात फणस, चिकू, सफरचंद, संत्री, मोसंबी, द्राक्षे तसेच विविध भाजीपाल्याचा समावेश होता.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या आरोग्याचा विचार करून अधिकृत मंडईतूनच भाजीपाला व फळे खरेदी करावीत, असे आवाहन केडीएमसीकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT