डोंबिवली : सध्याच्या डिजिटल युगात लहान मुले मोबाईल स्क्रीन, व्हिडिओ गेम आणि सोशल मीडियामध्ये अडकून पडलेली असताना डोंबिवलीतील दोन चिमुरड्या जुळ्या बहिणींनी सह्याद्रीच्या रांगड्या आणि दुर्गम कड्यांवर इतिहास रचला आहे. मूळच्या कोकणातील गुहागर येथील असलेल्या आणि सध्या डोंबिवलीत वास्तव्यास असलेल्या प्रेशा आणि रेशवी परेश कदम या जुळ्या बहिणींनी वयाच्या अवघ्या साडेसात वर्षांपूर्वीच महाराष्ट्रातील तब्बल २०० गड/किल्ले सर करण्याची अद्भुत आणि थक्क करणारी किमया साधली आहे.
ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या या दोघींनी ४ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च आणि अत्यंत कठीण समजला जाणारा धोडप किल्ला सर करत दुर्गभ्रमंतीचा हा द्विशतकी टप्पा पार केला आहे.
प्रेशा आणि रेशवी यांचा हा थक्क करणारा दुर्गभ्रमंतीचा प्रवास त्या अवघ्या अडीच वर्षांच्या असताना सुरू झाला होता. वडील परेश आणि आई रेश्मा यांच्या सोबतीने या दोघींनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या पवित्र किल्ले शिवनेरीवर आपले पहिले पाऊल ठेवले होते आणि तेथूनच त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली.
सह्याद्रीच्या रौद्र आणि खडतर वाटांवर बागडत या दोघींनी वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी १२ किल्ले सर करून थेट इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपल्या नावाची नोंद केली होती. तो केवळ एक आरंभ होता. त्यानंतर जिद्द, चिकाटी, सातत्य आणि अंगात भिनलेला शिवविचारांचा वारसा जपत या दोघींनी एकामागून एक गडकोट सर करण्याचा सपाटाच लावला आणि वयाच्या अवघ्या सात वर्षे पाच महिन्यांत त्यांनी सह्याद्रीच्या तब्बल २०० गडदुर्गांना गवसणी घातली आहे.
आपले अस्तित्व हे छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आहे आणि मावळ्यांच्या पराक्रमाने आणि रक्ताने पावन झालेली गड/किल्ल्यांची माती ही तीर्थासारखी पवित्र आहे. हा संस्कार प्रेशा आणि रेशवीच्या मनात लहानपणापासूनच रुजला आहे. याच श्रद्धा आणि भक्तीतून त्यांनी सर केलेल्या प्रत्येक गडावरील पवित्र माती आणि लहान पाषाण जपून ठेवले आहेत. १७५ किल्ल्यांचा टप्पा पार पडल्यानंतर या दोघींनी जमा केलेली ती पवित्र माती यावर्षी किल्ले रायगडावर तिथीनुसार झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात नेण्यात आली होती.
तिथे हजारो शिवभक्तांसमोर आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या कपाळावर याच पवित्र शिवतीर्थ मातीचा टिळा लावून शिवकालीन पराक्रमाचा गौरव करण्यात आला होता. कौतुकाची थाप व शिवरायांचा ध्यास सोबत घेऊन अविरतपणे गडवाटा तुडवणाऱ्या प्रेशा आणि रेशवी यांच्या या पराक्रमावर आज अवघ्या महाराष्ट्रातून आणि दुर्गप्रेमींमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
प्रत्येक गडाची कसून पूर्वतयारी अन् अभ्यास
कोणत्याही गडाची चढाई करण्यापूर्वी या दोघी कसून पूर्वतयारी करतात हे विशेष. गडाचा इतिहास, त्याची भौगोलिक रचना, चढाईचा मार्ग याचा सखोल अभ्यास करूनच त्या मोहिमेला सुरुवात करतात. वाटेत स्थानिक मार्गदर्शक आणि दुर्गमित्रांचे सहकार्य घेण्यासोबतच गडावर भेटणाऱ्या इतर शिवभक्तांशी आणि दुर्गप्रेमींशी त्या इतिहासावर मनमोकळी चर्चा करतात. पायात सह्याद्रीची चपळाई, डोळ्यांत शिवरायांचे तेज आणि अंगात अथांग ऊर्जा घेऊन भराभर पायऱ्या चढणाऱ्या या चिमुकल्या रणरागिणींना पाहून प्रत्येक दुर्गप्रेमी थक्क होतो आणि त्यांच्या जिद्दीला सलाम करतो.