Thane building balcony collapse  
ठाणे

Thane building balcony collapse : डोंबिवलीत ३७ वर्षे जुन्या धोकादायक इमारतीची गॅलरी कोसळली

केडीएमसीने रहिवाशांना तातडीने बाहेर काढून इमारत केली सील; बाधितांना भोगवटाधारक पत्राचे वाटप

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : जुन्या डोबिवलीतील रिक्षास्टँड जवळ असलेल्या तुकाराम निवास या ३७ वर्षे जुन्या धोकादायक इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील बाहेरील गॅलरीचा भाग गुरूवारी सायंकाळी अचानक कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घटनेचे गांभीर्य ओळखून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने तातडीने इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढले आणि इमारत पूर्णपणे रिकामी केली.

केडीएमसीचा अतिधोकादायक शिक्का

तळ + पाच मजल्यांची तुकाराम निवास ही इमारत १९८९ साली बांधली होती. या इमारतीचे मालक सागर ठाकूर आहेत. एकूण ३० कुटुंबे या इमारतीत पागडी पद्धतीच्या करारनाम्याने राहत होती. केडीएमसीने यापूर्वीच या इमारतीला अतिधोकादायक म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे घरे रिकामी करून अनेक कुटुंबांनी दुसरीकडे स्थलांतर केले आहे. तरीही सात ते आठ कुटुंबे अद्याप या इमारतीत वास्तव्यास होती.

गॅलरी कोसळताच प्रशासनाची तातडीची कारवाई

इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील बाहेरील गॅलरीचा भाग अचानक कोसळला. माहिती मिळताच केडीएमसी प्रशासन, पोलिस आणि स्थानिक लोकप्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून केडीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी इमारतीत राहणाऱ्या सर्व कुटुंबांना तात्काळ सुखरूप बाहेर काढले.

बाधित रहिवाशांना भोगवटाधारक पत्र

घटनास्थळी नगरसेवक दीपेश म्हात्रे, नगरसेविका रसिका पाटील, भाजपाचे पदाधिकारी कृष्णा पाटील, डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे, विष्णूनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम चोपडे यांच्यासह केडीएमसीचे अधिकारी उपस्थित होते. पालिका प्रशासनाने रहिवाशांची आवश्यक कागदपत्रे तपासून बाधित कुटुंबांना भोगवटाधारक पत्र दिले. पुढील कार्यवाहीसाठी इमारत सील करण्यात आली आहे. या घटनेनंतर कल्याण-डोंबिवलीतील जीर्ण झालेल्या जुन्या आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केडीएमसीने धोकादायक घोषित केलेल्या इमारती संबंधित रहिवाशांनी तातडीने रिकाम्या कराव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT