

Panvel PMC Dangerous Buildings List
पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीतील अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी तातडीने घरे रिकामी करून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे. सन २०२६-२७ साठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार महापालिका क्षेत्रातील ६४ इमारतींना ‘सी-१’ अर्थात अतिधोकादायक प्रवर्गात वर्गीकृत करण्यात आले आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २६४ ते २६८ तसेच राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिकेच्या चारही प्रभाग समित्यांमध्ये धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये प्रभाग समिती अ (खारघर) येथे ४, प्रभाग समिती ब (कळंबोली) येथे २०, प्रभाग समिती क (कामोठे) येथे ८ आणि प्रभाग समिती ड (पनवेल) येथे ३२ अशा एकूण ६४ इमारतींचा अतिधोकादायक यादीत समावेश करण्यात आला आहे.
महापालिकेकडून संबंधित इमारतींतील रहिवाशांना वेळोवेळी नोटिसा बजावून सदनिका रिक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, काही ठिकाणी नागरिक अद्यापही वास्तव्यास असल्याचे आढळून आले आहे. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे इमारती कोसळण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे कोणतीही जोखीम न पत्करता नागरिकांनी त्वरित सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मुंबई उच्च न्यायालय तसेच राज्य शासनाच्या निर्देशांनुसार संबंधित मालक अथवा भोगवटादारांनी इमारती रिकाम्या करून पाडण्याची कार्यवाही न केल्यास महापालिकेकडून संबंधित इमारतींचा वीज व पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल. तसेच आवश्यकतेनुसार पोलिसांच्या मदतीने इमारती रिकाम्या करून पाडण्याची कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
धोकादायक इमारती कोसळून जीवित किंवा वित्तहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित मालक, भोगवटादार, रहिवासी व भाडेकरूंवर राहील, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. तसेच सर्व धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याची जबाबदारी संबंधित मालक व भोगवटादारांची असल्याचेही जाहीर सूचनेत नमूद करण्यात आले आहे.
अतिधोकादायक इमारतींची प्रभागनिहाय संख्या
प्रभाग समिती अ (खारघर) – ४
प्रभाग समिती ब (कळंबोली) – २०
प्रभाग समिती क (कामोठे) – ८
प्रभाग समिती ड (पनवेल) – ३२
एकूण अतिधोकादायक इमारती : ६४