नेवाळी : डोंबिवलीच्या वाहतूक कोंडीने जागतिक विक्रम केला आहे. कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीत प्रचंड वाढ झाली आहे. तीन किलोमीटरचा अंतर पार करायला तब्बल पाच तासांचा अवधी लागल्याने वाहनचालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडून कोणत्याही प्रकारच्या उपायोजना कोंडी मुक्त प्रवासासाठी केल्या जात नसल्याने नेटकरी सत्ताधाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला जात आहे. देसाई नाका ते मानपाडा दरम्यान वाहतूक कोंडीत वाहनचालकांसह प्रवाश्यांचे प्रचंड हाल सुरु आहेत. त्यामुळे रस्ते कोंडीत अडकणाऱ्या वाहनचालकांची सत्ताधारी कधी पुढे येणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीने वाहनचालकांचे प्रचंड हाल सुरू केले आहेत. सायंकाळच्या सुमारास होणाऱ्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दररोज सायंकाळी देसाई नाका ते मानपाडा दरम्यान नाईट लाईफ कोंडीतून वाहनचालकांना मार्ग काढावा लागत आहे. सततच्या या कोंडीमुळे बदलापूर,अंबरनाथ, कल्याण,डोंबिवली परिसरातील कामगारवर्गाला सायंकाळी घरचा रस्ता धरतानाकोंडीच्या डोकेदुखीचा सामना करावा लागत आहे. परंतु लोकप्रतिनिधी सर्वसामान्य नागरिकांच्या होणाऱ्या या कोंडमाऱ्याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांकडून सोशल मीडियावर प्रचंड संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. तीन किलोमीटर अंतर पार करून बदलापूर,अंबरनाथ गाठत असताना खड्ड्यांचे देखील साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे या कल्याण शीळ रस्त्याचा कोंडीचा जागतिक विक्रम झाला आहे.
कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर मनसेचे नेते राजू पाटील यांनी देखील भाष्य केलं आहे. ते म्हणाले कि , या वाहतूककोंडीला एकमेव कारण आहे ते म्हणजे या रस्त्यावर असलेल्या ३ /४ मोठ्या बिल्डरांचे फ्लॅट्स विकले जावे म्हणून सुरू असलेले मेट्रोचे काम. खरंतर २२ किमी लांबीच्या या मेट्रो साठी कल्याण-शीळ रस्ता सोडला तर मानपाडा प्रिमियर ते तळोजा पर्यंतचे उरलेले १६/१७ किमी चे भूसंपादन देखील झाले नाही. अशावेळी फक्त या बिल्डरांच्या फायद्यासाठी स्वत:ला इम्फ्रामॅन संबोधवणारा बबड्या भाऊ हे काम हट्टाने सुरू ठेवण्यासाठी दबाव टाकत असल्याच्या चर्चा आहेत. खरंतर या रस्त्यात तिसऱ्या लेनसाठी बाधीत होणाऱ्या भूमीपुत्रांना मोबदला दिला तर किमान तिसरी लेन ताब्यात घेऊन त्यावर कॅांक्रीटीकरण करून रस्ता रुंद केल्यास थोडातरी दिलासा मिळू शकतो, परंतु या लोकांनी एमएमआरडीए व एमएसआरडीसी ला पण भिकेला लावली आहे व त्यामुळे मोबदला देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत. एकंदरीतच वाहतुक शाखा व पालिका प्रशासन सुद्धा यावर ज्याप्रकारे थंड बसून आहेत त्यावरून त्यांच्यावरही दबाव असल्याचे स्पष्ट होत आहे.
आता गणपती व नंतर लगेचच नवरात्री व दिवाळी पण येत आहे, त्यामुळे वाहतूक कोंडीत अजून भर पडेल. विद्यार्थ्यांच्या शाळा बुडो की चाकरमानी कामावर उशीरा पोहचो, पाऊस पडून तो लोकांच्या घरात जावो की या वाहतूककोंडीत कोणाचे जीव जावोत, आमच्या इथल्या निगरगट्ट सत्ताधाऱ्यांना त्याचे काहीही सोयरसुतक नाही. त्यांना सध्या फक्त इतरांचे पक्ष फोडून पक्ष प्रवेश घेण्यात जास्त रस आहे, मग भले या भयंकर वाहतूक कोंडीत आमच्या माता-भगिनी ४/४ तास अडकून राहिल्या तरी या निर्लज्जांना काहीही फरक पडत नाही. या निगरगट्ट सत्ताधाऱ्यांचेही एका अर्थाने बरोबरच आहे, कारण निवडणूकीत जय श्रीराम बोलले की त्यांना मतं मिळतात भले त्यांनी कितीही शेण खाल्लेले असावे, हे त्यांना चांगलेच समजले आहे. असो ! आमचे बालकमंत्री बबड्या भाऊ पुढे हतबल आहेत, ते काहीच करू शकत नाही. त्यामुळे आता तरी लवकरात लवकर मा. मुख्यमंत्री साहेब व संबंधित खात्यानेच यात लक्ष घालून हे काम किमान दिवाळी संपेपर्यंत बंद ठेवावे अन्यथा यापुढे लोकांना या रस्त्यावर लावलेले पत्रे उखडून फेकून देण्याशिवाय पर्याय उरणार नाही, अर्थात त्या लोकांसोबत आम्हीही असूच याची नोंद घ्यावी असं पाटील यांनी म्हटलं आहे.
कल्याण शीळ रस्त्यावरील कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल सुरु आहेत. सत्ताधाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष सुरु आहे. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड घेतली आहे. नागरिकांच्या समस्यांना विरोधकांनी हात घातल्याने विरोधकांच्या या आंदोलनांमध्ये सर्वसामान्य नागरिक देखील सहभाग घेताना दिसून येत आहेत. सण उत्सवांचा कालखंड सुरु लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याने करायचे काय ? असा प्रश्न आता मतदारांना पडला आहे.