ठाणे : घोडबंदर महामार्गावर विशेषत: गायमुख घाटात रोजची कोंडी होत आहे. ती टाळण्यासाठी सेवा रस्ते जोडणीची कामे 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महापालिका अधिकार्यांना दिले आहेत. ही कामे पूर्ण होईपर्यंत या मार्गावर अवजड वाहनांना रात्री 12 ते पहाटे 6 पर्यंत बंदी घालण्यात यावी.सकाळी अवजड वाहने भिवंडी मार्गाने वळवण्यात यावीत, असे आदेशही सरनाईक यांनी वाहतूक विभागाला दिले आहेत.
घोडबंदर मार्गावरील प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिकेत महत्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला एमएमआरडीएचे अधिकारी आणि ठाणे महापालिकेचे अधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी हे निर्दश दिले आहेत.
ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पालघर आणि गुजरात भागातील वाहतुकीसाठी घोडबंदर हा मार्ग महत्वाचा मानला जातो. या मार्गावरून अवजड वाहनांसह स्थानिकांची वाहने याच मार्गावरून धावतात. या मार्गावर मुख्य आणि सेवा रस्ता जोडणी तसेच मेट्रो प्रकल्पाची कामे एकाच वेळी सुरू असल्याने मार्ग अरुंद झाला आहे. त्यामुळे या मार्गावर रोज वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच गायमुख रस्त्याची दुरावस्था व डोंगर भागातून येणारे पावसाचे पाणी यामुळे कोंडीत भर पडत आहे.
या कोंडीमुळे नागरिक हैराण असून कोंडी सोडवण्यासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सेवा रस्ते जोडणीची कामे 31 डिसेंबर पर्यंत करून तोपर्यंत घोडबंदर मार्गावर सर्व अवजड वाहनांना बंदी घालण्यात घालण्याचे आदेश सरनाईक यांनी दिले आहे. तशाप्रकारे परिपत्रक काढण्याचे निर्देशही त्यांनी वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाठ यांना दिले. बैठकीत मोघरपाडा येथील कांदळवन उद्यान, कासारवडवली येथील तलावाचे सुशोभीकरण, जुन्या उद्यांनाचे नवीनीकरण, याचा आढावा मंत्री सरनाईक यांनी यावेळी घेतला.
उद्घाटनाची आता तारीख द्या...
बैठक खूप झाल्या आता उद्घाटनासाठी तारीख द्या,आम्हाला केलेल्या विकासकामांची लवकर उदघाटन करायची आहे असा टोला परिवहन मंत्री सरनाईक यांनी पालिका अधिकार्यांना लगावला आहे.
वनराई क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न करा
या बैठकीत नांगला बंदर खाडी किनारा विकसित करताना त्या जमिनीवर जास्तीत जास्त वृक्षारोपण करून वनराई क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न केले जावेत अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिल्या आहेत. त्यामुळे ठाण्यातील वनराई क्षेत्र वाढविण्यासाठी मदत होईल, असेही ते म्हणाले.