Thakurli Knife Attack In Train
डोंबिवली: सुरक्षेच्या दृष्टीने लोकलच्या डब्यात विडी, सिगारेट ओढण्यास मनाई केल्याच्या रागातून दोघा तरूणांनी कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रतिनिधीवर धावत्या लोकलमध्ये चाकू हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि.२७) सकाळच्या सुमारास मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली स्थानकादरम्यान घडली.
याप्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी फरार हल्लेखोरांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरू केला आहे. भरत टोपले असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रतिनिधीचे नाव आहे.
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी भरत टोपले हे कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील शहाड परिसरात कुटुंबासह राहतात. टोपले हे गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटनेचे शहाड प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी सकाळच्या सुमारास टोपले हे कसाऱ्याहून सीएसटीकडे जाणाऱ्या लोकलने प्रवास करत होते. त्याच सुमारास त्यांना ठाकुर्ली रेल्वे स्थानकावर मालडब्यात चढलेल्या तरूणांना सिगारेट-विडी ओढण्यास मनाई केली. त्या तरूणांनी प्रतिसाद देण्याऐवजी अचानक भरत टोपले यांच्यावर चाकूने वार केले. यात त्यांच्या नाकाच्या बाजूला गंभीर इजा झाली, तर डोळा थोडक्यात वाचला. हल्लेखोरांनी पुढील स्थानकावर उतरून पळ काढला.
हल्लेखोर तरूणासोबत त्याचे आणखी दोन साथीदार असे तिघे जण होते. हे त्रिकुट कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील खडवली रेल्वे स्थानकातून कसारा लोकलमध्ये शेवटच्या गार्डच्या डब्याजवळील लगेज डब्यामध्ये सकाळच्या सुमारास लोकलमधून प्रवास करत होते. त्यानंतर हल्लेखोर तरूणाने धावत्या लोकलमधील लगेजच्या डब्यात सिगारेट पेटवली. हे पाहून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून टोपले यांनी हटकले असता त्या तरूणांनी ठाकुर्ली रेल्वे स्थानकात चाकूने वार करून लोकलमधून उड्या मारून पळ काढला. ही सर्व माहिती जखमी भरत टोपले यांनी दिली.
चाकू हल्ला करून फरार झालेल्या हल्लेखोरांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव आणि सरचिटणीस श्याम उबाळे यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना केली. जर आमच्या रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रतिनिधीवर हल्ले होत असतील तर सर्वसामान्य प्रवासी किती सुरक्षित असेल ? हे घडलेल्या घटनेतून दिसून येते. या संदर्भात आपण लवकरच मध्य रेल्वेच्या पोलिस आयुक्त आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या प्रमुखांची भेट घेऊन निवेदन देणार आहोत, असेही सरचिटणीस श्याम उबाळे यांनी सांगितले.
विशेष म्हणजे मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकलमध्ये रात्रीच्या वेळी कसारा लोकलमध्ये खुलेआम तीन पत्ते जुगार आणि मद्यपान केले जाते. हा प्रकार ११ - १२ च्या कसारा लोकलमध्ये सुरू असतो. मांडी घालून घोळक्याने टोळकी बसतात. त्यात गर्दुल्ले देखील मागील लगेजमध्ये सर्रास गांजा/सिगारेट ओढतात. आरपीएफ व जीआरपी यांनी सिव्हिल ड्रेसमध्ये प्रवास करून पाहणी करून अशा बदमाशांवर संयुक्त कारवाई करावी, अशीही मागणी कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे.
डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, भरत टोपले यांच्या तक्रारीवरून अनोळखी दोन तरूणांविरोधात भारतीय न्याय संहिता कलमांनुसार, तसेच रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने फरार आरोपींचा शोध आमचे पथक घेत आहे.