Shiv Sena Complaint Dombivli Police Pudhari
ठाणे

Dombivli Tree Cutting | डोंबिवलीच्या क्रीडा संकुलातील वृक्षतोड प्रकरण तापले; शिवसेनेची पोलिसांकडे तक्रार

कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Shiv Sena Complaint Dombivli Police

डोंबिवली :
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची मालकी असलेल्या डोंबिवली एमआयडीसीतील वै. हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलात झालेले वृक्षतोड प्रकरण आता चांगलेच तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या प्रकरणात उडी घेतली आहे. उबाठाने या गंभीर प्रकरणात लक्ष घातले असून पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. क्रीडा संकुलतील वृक्षवल्ली नष्ट करणाऱ्या संबंधित कंत्राटदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची उबाठाने मागणी केली आहे.

उबाठाचे कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत यांच्या नेतृत्वाखाली उपशहरप्रमुख प्रमोद कांबळे, माजी विभागप्रमुख राजू नलावडे, शाखाप्रमुख मंगेश सरमळकर, स्वप्नील पाटील आदींच्या शिष्टमंडळाने बुधवारी मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. हभप सावळाराम क्रीडा संकुलात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याचे आढळून आले आहे.

ही वृक्षतोड लपविण्यासाठी संकुलाच्या सभोवताली पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहेत. या प्रकारामुळे क्रीडा संकुलातील हिरवळ नष्ट झाली असून पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले आहे. या वृक्षतोडीस जबाबदार असलेल्या कंत्राटदारावर महाराष्ट्र झाडे तोडणे नियमन अधिनियम १९६४ चे कलम ४, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ४२७, २८५, तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम १५ अन्वये गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी.

जेणेकरून भविष्यात कुणीही अशाप्रकारे वृक्षतोड करण्याचे धाडस करणार नाही. सोबत वृक्षतोडीचे फोटो जोडले असून वृक्षतोडीचा व्हिडीओ व्हॉट्स ॲपवर पाठवत असल्याचेही जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत यांनी त्यांच्या निवेदनात नमूद केले आले. आता पोलिस या प्रकरणी काय कार्यवाही करतात ? याकडे समस्त डोंबिवलीकर आणि पर्यावरणप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न

वृक्षवल्ली नष्ट करून डोंबिवलीकरांच्या ऑक्सिजनवर प्रत्यक्ष घाला घालण्यात आला आहे. एकिकडे केडीएमसी वर्षभरात दीड लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट सांगत असताना दुसरीकडे आपल्याच मालकीच्या क्रीडा संकुलातील शेकडो झाडे विकासाच्या नावाखाली तोडली जात असल्याकडे जिल्हाप्रमुख सावंत यांनी व पोनि संदीपान शिंदे यांचे लक्ष वेधले.

क्रीडा संकुलाशी संबंधित असलेल्या डोंबिवलीकर, खेळाडू, क्रीडाशौकीन आणि पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी पुढाकार घेऊन संबंधितांच्या विरोधात कठोर कारवाईचा बडगा उगारावा, अशी अपेक्षा व्यक्त केल्याचे जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT