Dombivli Smart Meter Pudhari
ठाणे

Dombivli Smart Meter: स्मार्ट मीटरवरून डोंबिवलीत संताप! महावितरणच्या नोटिसांमुळे ग्राहक आक्रमक

डोंबिवलीकरांना स्मार्ट मीटरसाठी महावितरणकडून नोटीसांद्वारे धमक्या; वीज ग्राहकांमध्ये प्रचंड संताप

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली: स्मार्ट मीटर लावण्यासाठी महावितरणकडून डोंबिवलीकरांना नोटीसांद्वारे धमक्या येऊ लागल्या आहेत. याचा प्रत्यय आलेल्या एमआयडीसीच्या निवासी विभागातील वीज ग्राहकांनी चीड व्यक्त केली आहे.

स्मार्टमीटर संदर्भात विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची घोषणा केली होती.

स्मार्ट मीटर लावण्यासाठी कुणावरही सक्ती करण्यात येणार नाही असे आश्वासन दिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या आदेशांना महावितरणकडून चक्क केराची टोपली दाखविली जात असल्याचा धडधडीत पुरावा डोंबिवलीकरांच्या हाती लागला आहे.

समस्त डोंबिवलीसह निवासी विभागामध्ये जून २०२६ मध्ये स्मार्ट मीटर लावण्यासाठी महावितरणकडून सक्ती करण्यात आली होती. त्यावेळी अनेक रहिवासी सोसायट्यांनी महावितरणला लेखी पत्र देऊन स्मार्टमीटर बसविण्यास तीव्र विरोध केला होता.

तर काही सोसायट्यांनी आपल्या विद्युत मीटर बॉक्सला कुलूप लावून घेतले होते. ग्राहकांचा वाढता विरोध लक्षात आल्यानंतर महावितरण आणि त्यांच्या खासगी ठेकेदारांनी स्मार्ट मीटर लावण्याचे काम काही काळासाठी स्थगित केले होते.

मात्र आता गेल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा महावितरण आणि ठेकेदाराकडून स्मार्ट मीटर लावण्यासाठी सक्ती करण्यात येत असून त्यासाठी रीतसर नोटीस पत्र रहिवासी इमारतींना महावितरणकडून देण्यात येत आहे.

जर तुम्ही हे स्मार्ट मीटर आता लावून घेतले नाही तर पुढे तुम्हाला हे स्मार्ट मीटर स्वखर्चाने लावावे लागेल, असे या नोटिशीत नमूद करून दबाव टाकला जात आहे. काही रहिवासी इमारतींना न विचारताच असे स्मार्ट मीटर लावले आहेत. तर ज्या सोसायट्यांनी आपल्या मीटर बॉक्सला कुलूप लावले आहे त्यांची मात्र आता पंचाईत झाली आहे.

निवासी विभागातील नव संकुल सोसायटीतील रहिवाशी सुदेश बेर्डे व इतरांनी या सक्तीच्या स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध दर्शवला आहे.

आमचे जुने मीटर सुस्थितीत असताना ही वीज बिले जास्त दाखवणारे जाचक स्मार्ट मीटर का बसविण्यात येत आहेत ? आधीच सारे जण महागाईने त्रस्त असताना त्यात या मीटरमुळे आम्हाला जर वाढीव जास्त बिल आली तर ते आम्ही कसे भरू ? याची चिंता आम्हाला लागली आहे.

जर स्मार्ट मीटर लावायचेच होते तर हा उपक्रम महावितरणने स्वतः का राबविला नाही ? सरसकट संपूर्ण वीज ग्राहकांना एका खालगी कंपनी मार्फत दावणीला का बांधत आहात ? असा सवाल सुदेश बेर्डे यांच्यासह अनेक ग्राहकांनी उपस्थित केला आहे.

अनेक गृहिणींनी देखील अशीच चिंता व्यक्त करून प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केल्याची माहिती या भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांचा शब्दही मोडला?

विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटर लावण्यासाठी कोणावरही सक्ती करण्यात येणार नाही असे विधिमंडळात आश्वासन दिले होते, परंतु प्रत्यक्षात आता मात्र सक्तीने नोटीस देऊन स्मार्ट मीटर लावण्यात येत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या आदेशांना महावितरणकडून अशा पद्धतीने केराची टोपली दाखविली जात असल्याचा धडधडीत पुरावा डोंबिवलीकरांच्या हाती लागला आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशांना केराची टोपली दाखविणाऱ्या महावितरणकडून काय निर्णय घेतला जातो याकडे समस्त कल्याण-डोंबिवलीकर ग्राहकांच्या नजरा लागल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT