Dombivli skywalk robbery case Pudhari
ठाणे

Dombivli skywalk robbery case: व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून लुटारूचा पोबारा

दरम्यान जास्त गडबड केल्यास चाकू खुपसून मारीन, अशा धमक्या देत लुटारूने या व्यापाऱ्याच्या खिशातील दहा हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून लुटारूने रेल्वे स्थानकाच्या दिशेने पोबारा केला.

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली: ‌‘धक्का मारतोस... त्यामुळे मला दुखापत झाली...‌’ असा कांगावा करत डोंबिवलीच्या पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या रेल्वेच्या स्कायवॉकवर श्रीखंडेवाडीतील व्यापाऱ्याला दिवसाढवळ्या चाकूचा धाक दाखवून लुटल्याचा प्रकार समोर आला आहे.

दरम्यान जास्त गडबड केल्यास चाकू खुपसून मारीन, अशा धमक्या देत लुटारूने या व्यापाऱ्याच्या खिशातील दहा हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून लुटारूने रेल्वे स्थानकाच्या दिशेने पोबारा केला.

डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रोडला असलेल्या श्रीखंडेवाडीत राहणारे गौरव गाला यांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. पांडुरंगवाडीमध्ये कॉस्मेटिकचा व्यवसाय करणारे व्यापारी गौरव गाला हे काही दिवसांपूर्वी मुलुंडला व्यवसायाच्या निमित्ताने गेले होते.

दुपारच्या सुमारास लोकलने डोंबिवलीत उतरल्यानंतर स्कायवॉकवरून पूर्वेकडे असलेल्या इंदिरा चौकाच्या दिशेने जात होते. इतक्यात समोरून येणाऱ्या अनोळखी इसमाने गौरव यांना जोरात धक्का मारला. त्यावेळी त्या इसमाने मला धक्का का मारला? असा जाब विचारत, यामुळे मला दुखापत झाल्याचे दरडावून सांगितले. त्या इसमाने खिशातून चाकू काढून जास्त गडबड केली तर आजूबाजूला सर्व माझीच माणसे आहेत. त्यामुळे तुला येथून जाऊ देणार नाही, अशी धमकी गौरव यांना दिली.

या प्रकाराने व्यापारी गौरव गाला हे भयभीत झाले. ही संधी साधून लुटारूने चाकूचा धाक दाखवून गौरव यांच्या खिशातून दहा हजार रुपयांची रोकड हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत ती रक्कम काढून घेतली.

गौरव यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र लुटारूने यावेळी हाताला झटका देऊन तेथून पळ काढला. गौरव यांनी लुटारूचा पाठलाग करत काही अंतरावर रोखले. त्यावेळीही लुटारूने जास्त गडबड केल्यास पुलावरून फेकून देईन, अशी धमकी देऊन पलायन केले. भयभीत झालेल्या व्यापारी गौरव गाला यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून पसार झालेल्या लुटारूचा शोध सुरू केला आहे.

गर्दुल्ल्यांसह फेरीवाल्यांवर संशय

या प्रकारामुळे आता डोंबिवली रेल्वे स्थानकासह स्कायवॉक देखील असुरक्षित असल्याची भीती प्रवासी आणि पादचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. असे प्रकार यापूर्वी कल्याण रेल्वे स्थानक परिसरासह स्कायवॉकवर घडत होते. पूर्वी रात्रीच्या सुमारास कल्याण-डोंबिवलीच्या रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांना लुटण्याचे प्रकार घडले आहेत. आता तर दिवसाढवळ्या असे प्रकार घडू लागले आहेत. रेल्वे स्थानक परिसरात घुटमळणारे गर्दुल्ले आणि बेरोजगार फेरीवाले प्रवाशांना लक्ष्य करत असल्याच्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT