पहलगाम बैसरन येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवलीत बंद पाळण्यात आला. यावेळी रस्त्यावर शुकशुकाट होता.  pudhari photo
ठाणे

Pahelgam Terror attack: दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवली बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

Terror attack protest: व्यापाऱ्यांसह हॉटेल व्यवसायिकांचा उत्स्फूर्त सहभाग

पुढारी वृत्तसेवा

Protest against terrorism in Dombivli

डोंबिवली : पहलगाम बैसरन येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध आणि या हल्ल्यात डोंबिवलीतील तीन नागरिकांचे बळी गेल्याने संतप्त झालेल्या डोंबिवलीतील सर्व पक्षीय नेत्यांनी बुधवारी डोंबिवली बंदची हाक दिली होती. या हाकेला नागरिकांसह व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत गुरूवारी आपली दुकाने, हॉटेल्स व बाजारपेठा बंद ठेवल्या होत्या.

डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरासह मुख्य व अंतर्गत रस्ते नेहमी गजबजलेले असतात. या रस्त्यांवरील दुकाने, व्यापारी, बाजारपेठा सकाळपासून सुरू होतात. दुकाने, भाजीपाला बाजारातील खरेदीसाठी नागरिकांची सकाळपासून धांदल असते. मात्र काळजाचा ठोका चुकविणाऱ्या पहलगाम बैसरनतील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळपासून डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागातील बाजारपेठा, दुकाने, हॉटेल्स स्वयंस्फूर्तीने बंद ठेऊन व्यापाऱ्यांनी बंदमध्ये आपला सहभाग दर्शवला होता.

पहलगाम बैसरन येथील दहशतवादी हल्ल्यात संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने या निष्पाप डोंबिवलीकरांचा मृत्यू झाला. बुधवारी या तिन्ही डोंबिवलीकरांचे पार्थिव भागशाळा मैदानात अंत्यदर्शनासाठी आणल्यानंतर परिसर शोकाकुल झाला होता. शोकाकुल वातावरणात संतप्त नागरिकांनी पाकिस्तान निषेधाच्या घोषणा दिल्या.

काही नागरिकांनी तर रेल्वे स्थानक भागात स्वयंस्फूर्तीने जमवून केंद्र सरकार, राजकारणी, लोकप्रतिनिधींवर शाब्दिक आसूड ओढले. निष्पाप नागरिकांचे बळी जात असताना सरकार काय करत होते ? कोठे गेले तुमची सुरक्षा व्यवस्था ? स्वत: एक्स, वाय, झेड सुरक्षा व्यवस्थेत फिरायचे आणि लोकांना वाऱ्यावर सोडायचे. देश-विदेशांचे दौरे करायचे. जेव्हा राजकारण्यांच्या मुलांचे अपहरण होईल तेव्हा सामान्य नागरिकांचा जीव काय किंमतीचा असतो, असा सवाल करत संतप्त प्रतिक्रिया स्वयंस्फूर्तीने आंदोलन करणारे नागरिक देत होते.

तिन्ही पार्थिवांवर बुधवारी रात्री भागशाळा मैदानातून ट्रकमध्ये ठेवले जात असताना नागरिकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. नागरिकांच्या भावना विचारात घेऊन आमदार रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, माजी नगरसेवक राहूल दामले, मंदार हळबे, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, शहरप्रमुख अभिजीत सावंत, शिंदे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, विवेक खामकर, मनसेचे शहराध्यक्ष राहूल कामत यांच्या एकत्रित विचारातून गुरुवारी डोंबिवली बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. ही घोषणा भागशाळा मैदानातून केल्यानंतर नागरिकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

जनतेच्या मनातील ही धग गुरुवारी डोंबिवली बंदच्या माध्यमातून दिसून आली. सकाळपासून नागरिक, नोकरदार, परीक्षार्थी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून डोंबिवलीत रिक्षा, केडीएमटी, नवी मुंबई परिवहनच्या बस सुरू होत्या. एकही दुकान न उघडले गेल्याने व्यापारी पेठांमध्ये कडकडीत बंद दिसून आला. बंदमुळे रस्त्यावरील नागरिकांची वर्दळ कमी होती. अनेक नोकरदार आणि चाकरमान्यांसह व्यावसायिकांनी आपल्या खासगी आस्थापनाही बंद ठेवल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT