

Pakistani citizens visa canceled
नवी दिल्ली : काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांसाठीची व्हिसा सेवा तात्काळ प्रभावाने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती देणारे निवेदन परराष्ट्र मंत्रालयाने जारी केले. सर्व पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावा आणि भारतीयांनी पाकिस्तानचा प्रवास करु नये, असे मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत बुधवारी हा निर्णय झाला होता. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी (दि.२४) अधिकृत निवेदन जारी केले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट सुरक्षा समितीने घेतलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने, भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा सेवा तात्काळ स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व वैध व्हिसा २७ एप्रिल २०२५ पासून रद्द केले आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. पाकिस्तानी नागरिकांना दिलेले वैद्यकीय व्हिसा फक्त २९ एप्रिल २०२५ पर्यंत वैध असतील, असे निवेदनात म्हटले आहे. सध्या भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या व्हिसाची मुदत संपण्यापूर्वी भारत सोडावा, असे मंत्रालयाने म्हटले.
भारतीय नागरिकांना पाकिस्तानचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला जातो, असे निवेदनात म्हटले आहे. सध्या पाकिस्तानात असलेल्या भारतीय नागरिकांनाही लवकरात लवकर भारतात परतावे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.