डोंबिवली : पश्चिम डोंबिवलीतील मोठागाव रेतीबंदर ते कुंभारखाणपाडा हा उल्हास खाडीचा पट्टा रेतीमाफियांचे कुरण आहे. महसूल विभागाने उल्हास खाडीतून बेसुमास रेती उत्खनन करणाऱ्या माफियांचे पेकाट पार मोडून काढले आहे. गुरूवारी दुपारी खाडीला उधाण आले असतानाही अशा परिस्थितीत खाडी पात्रात रेतीचा बेकायदा उपसा करणाऱ्या या माफियांची ३० लाख रूपयांच्या यांत्रिक सामग्रीला आगी लावून भस्मसात करुन महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी यंत्रसामुग्री खाडी पात्रात बुडून टाकली. महसूल खात्याच्या आक्रमक पावित्र्यामुळे या पट्ट्यातील रेतीमाफियांची दाणादाण उडाली आहे.
कल्याण-डोंबिवलीतील महसूल विभागाकडून कोपर, रेतीबंदर, मोठागाव, कुंभारखाणपाडा, देवीचापाडा परिसरात वाळू माफियांच्या विरोधात जोरदार मोहीम सुरू आहे. कारवाई दरम्यान माफियांची लाखो रूपयांची सामग्री यापूर्वीही नष्ट करण्यात आली आहे. तरीही नवीन यंत्रसामग्री तयार करून पुन्हा खाडी पात्रात रेतीचा हे माफिया उपसा करण्यासाठी सक्रिय होतात. असाच उपसा सुरू असल्याची खबर मिळताच उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर आणि कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण विभागाचे मंडळ अधिकारी दीपक गायकवाड, डोंबिवली विभागाचे रविंद्र जमदरे, ग्राम महसूल अधिकारी अरूण कासार, कौस्तुभ मुणगेकर, प्रशांत चौगुले आणि त्यांच्या पथकाने पश्चिम डोंबिवलीतील कोपरपासून मोठागाव ते कुंभारखाणपाडा पट्ट्यात बोटीतून गस्त सुरू केली.
मुसळधार पावसामुळे उल्हास खाडीला भरती आली होती. अशा परिस्थितीत खाडी पात्रात रेती माफिया नसावेत, असा पथकाला अंदाज होता. पाऊस सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात रेती वाहून येते. कमी कालावधीत रेतीचा उपसा करता येत असल्याने दोन बार्जेस आणि चार उपसा पंपांद्वारे रेतीबंदर ते कुंभारखाणपाडा खाडीच्या मध्यभागी माफिया रेतीचा उपसा करताना गस्तीवरील पथकाला आढळून आले. पथकाने तात्काळ आपली बोट रेती माफियांच्या उपसा बोटीकडे वळवली. हे पाहून रेती उपसा बोटींवरील माफिया आणि त्यांच्या मजुरांनी खाडी पात्रात उड्या टाकून भिवंडीच्या दिशेने पोहत पळ काढला.
रेतीच्या उपशाची खाडी पात्रातील अवजड सामग्री सहज खेचून खाडी किनारी आणणे अशक्य होते. त्यातच खाडीच्या पाण्याचा वेगवान प्रवाह, मुसळधार पाऊस यामुळे रेतीच्या उपसा बोटी आणि पंपावर कारवाई करण्याचे आव्हान पथकासमोर होते. अखेर आहे त्या जागीच बार्जेस आणि उपसा बोटी बुडवून त्यातील यंत्रसामग्री जाळून टाकण्याचा निर्णय पथकाने घेतला. त्यानुसार बार्जेससह असलेल्या उपसा पंपांना गॅस कटरच्या साह्याने कापून हे पंप आणि त्या सोबतच्या बोटी खाडी पात्रात बुडविण्यात आल्या.
उपसा पंप आणि बोटींवरील यंत्रसामग्रीचा पुन्हा वापर होऊ नये यासाठी सर्व यंत्रसामुग्री पेटवून भस्मसात केली. यात १४ लाखांचे २ बार्जेस, १६ लाखांचे ४ उपसा पंप अशी एकूण ३० लाखांची रेती माफियांची सामग्री खाडीत बुडवली. खाडी पात्रात बेकायदेशीररित्या रेतीचा उपसा करणाऱ्यांविरूध्दची मोहीम कायम सुरू राहणार आहे. वर्षभरात वाळू उपसा करणाऱ्यांची लाखो रूपयांची सामग्री खाडी पात्रात बुडवली. काही जाळून नष्ट केल्याची माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली.