accident file photo
ठाणे

Dombivli Accident | डोंबिवलीत भरधाव रिक्षाच्या धडकेत वृध्देचा मृत्यू

टिळकनगर पोलिसांकडून फरार रिक्षावाल्याचा शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

Elderly Woman Death Accident

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडे असलेल्या शेलार नाका ते मंजुनाथ शाळे दरम्यान रस्ता ओलांडत असताना ६८ वर्षाच्या एका वृध्द महिलेला भरधाव वेगात असलेल्या रिक्षाने जोरदार धडक दिली. या धडकेत वृध्द महिला गंभीर जखमी झाली. रूग्णालयात तीन दिवस मृत्यूशी झुंज देत असलेल्या या वृद्धेचा अखेर मृत्यू झाला. याप्रकरणी बेदरकार रिक्षा चालविणाऱ्या फरार चालकाच्या विरोधात टिळकनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे.

रेखा उत्तम कासुर्डे (वय ६८) असे मृत वृध्देचे नाव असून त्या डोंबिवली जवळच्या खंबाळपाड्यातील आपल्या मुलाकडे राहत होत्या. या प्रकरणी रेखा यांचा मुलगा अविनाश कासुर्डे यांनी टिळकनगर पोलिस ठाण्यात एमएच ०५/बी जी/६३६८ या क्रमांकाच्या रिक्षा चालका विरूध्द तक्रार केली आहे. पोलिसांनी मोटार वाहन कायद्याने गु्न्हा दाखल करून घेतला आहे.

दहा दिवसांपूर्वी अविनाश यांची आई रेखा कासुर्डे या शेलार नाका ते मंजुनाथ शाळे दरम्यानच्या रस्त्यावरून पायी जात होत्या. रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगातील रिक्षाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेमुळे आपली वृध्द आई रस्त्यावर कोसळली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. बेशुध्दावस्थेत असलेल्या आईला इतरांच्या मदतीने एमआयडीसीच्या निवासी विभागातील एका खासगी रूग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, तीन दिवसांनंतर आईचा मृत्यू झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आईचा मृत्यू झाल्याची माहिती मुलगा अविनाश कासुर्डे यांनी टिळकनगर पोलिसांना दिली.

अविनाश यांनी अपघात ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज पाहिले असता एक रिक्षा तेथून भरधाव वेगात जात होती. त्या रिक्षाने रस्ता ओलांडणाऱ्या आईला जोरात धडक दिली. आईला मदत करण्याऐवजी रिक्षावाल्याने तेथून पळ काढला. टिळकनगर पोलिसांनी सदर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या रिक्षावाल्याचा शोध सुरू केला आहे.

झटपट भाड्याच्या हव्यासामुळे अपघात

झटपट भाडे मिळविण्यासाठी कल्याण-डोंबिवलीत रिक्षावाल्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. भाडे मिळविण्याच्या नादात भरधाव वेगात बेदरकारपणे रिक्षा चालवून इतर वाहन चालक, पादचाऱ्यांच्या जीवाशी खेळत आहेत. निष्काळजीपणे रिक्षा चालविणाऱ्या अनेक चालकांकडे आवश्यक कागदपत्रे नसतात. काहींनी मूळ मालकांकडून रिक्षा भाड्याने चालविण्यास घेतलेल्या असतात. त्यामुळे दिवसभरात जास्तीत जास्त प्रवासी फेऱ्या मारून बक्कळ पैसे कमविण्याचे अशा चालकांचे उद्दिष्ट्य असल्याचे जाणकार रिक्षावाले सांगतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT