

ठाणे : मुंब्रा येथील हिंदू संमेलनात मुस्लीम समुदायाबाबत आक्षेपार्ह विधाने करून धार्मिक द्वेष निर्माण करणे, डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात चिथावणी देणे आणि संविधानिक मूल्यांची पायमल्ली करीत राष्ट्रीय सन्मानांचा म्हणजेच संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी फिर्याद राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी आज नौपाडा पोलीस ठाण्यात दिली आहे.
शनिवारी नामदार नितेश राणे यांनी मुंब्रा येथील हिंदू संमेलनात अनेक वादग्रस्त विधाने केली होती. मुंब्र्यातील मुस्लीम समाजाविषयी अत्यंत आक्षेपार्ह विधाने केली होती. तसेच, आपण मंत्री आहोत म्हणून ठिक, नाहीतर जितेंद्र आव्हाड यांना घरी जाऊ दिले नसते, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने तीव्र शब्दात निषेध केला आहे.
याप्रकरणी मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली महिलाध्यक्षा मनिषा भगत, युवक अध्यक्ष अभिजीत पवार यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त संभाजी जाधव आणि नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांची भेट घेऊन धार्मिक द्वेष पसरवून दंगलीस प्रोत्साहन देणे आणि राष्ट्रीय सन्मान - अपमान प्रतिबंधक कायदा 1971 अन्वये गुन्हा दाखल करावा, अशी लेखी फिर्याद दिली.
याबाबत पत्रकारांशी संवाद साधताना मनोज प्रधान म्हणाले की, मुंब्रा - कौसा भागात अनेक वर्षांपासून हिंदू - मुस्लीम गुण्यागोविंदाने रहात आहेत. त्यांच्यात साधे भांडणही होत नाही. अशा स्थितीत बाहेरून येऊन नितेश राणे दंगल माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही बाब अत्यंत धोकादायक आहे. डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात चिथावणी दिली जात आहे. एकीकडे मंत्रिपदाची शपथ घेताना सर्व जाती- धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन काम करण्याची संविधानिक शपथ नितेश राणे यांनी घेतली आहे. तर दुसरीकडे विशिष्ट समाजाबाबत आकस ठेवून ते कृती करीत आहेत. हा संविधानिक मूल्यांचा अवमान आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत आपण लेखी फिर्याद दिली आहे.
मुंब्र्याचे नाव मुंब्रादेवी करण्याबाबत पत्रकारांनी विचारले असता, जनतेला जे अपेक्षित असेल तेच होईल. पुन्हा नितेश राणे यांनी आमच्या शहरात येऊन दंगल भडकाविण्याचा प्रयत्न केला तर आम्ही जोरदार विरोध करू, असे प्रधान म्हणाले. तर, स्थानिक नगरसेविका तथा महिलाध्यक्षा मनिषा भगत यांनी, आगरी - कोळी समाजाच्या देवींना आम्ही बाया म्हणतो. या बायांना मुंब्रादेवी असे म्हटले जाते. या देवीच्या नावावरूनच स्टेशनला मुंब्रा हे नाव मिळाले आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्यांनी उगाच भांडणं लावू नयेत. येथे आम्ही सर्व भावकीसारखे राहतो. आमच्या गावात येऊन भांडणे करण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही, असे सांगितले.
यावेळी जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश साटम , महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मकसुद खान, मिलिंद बनकर, सचिन पंधरे , शिवा कालू सिंह, आशिष उमासरे, साहिल उदुगडे , प्रविण सिंह, कैलास सूरकर आदी उपस्थित होते.