डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील सर्वाधिक वदर्ळीच्या बापूसाहेब फडके रोडला असलेल्या बाजीप्रभू चौकात रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या मध्यभागी रिक्षा उभी करून थांबलेल्या एका रिक्षावाल्याने दुचाकीस्वाराच्या पत्नी आणि लहान मुला समक्ष दुचाकीस्वाराच्या डोक्यात पेव्हर ब्लाॅकने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. आपल्याशी पंगा घेतला तर जीवे मारून टाकीन अशीही रिक्षावाल्याने धमकी दिली. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून हल्लेखोर रिक्षावाल्याचा शोध सुरू केला आहे.
शिवम कैलास पवार (२१) असे हल्लेखोर रिक्षावाल्याचे नाव असून तो पूर्वेकडील शेलार नाक्यावर असलेल्या एस. बी. शेलार कार्यालयामागे असलेल्या झोपडपट्टीत राहतो. त्याच्या विरोधात गणेश हनुमंत इदाते (३६) या जखमी दुचाकीस्वाराने दिलेल्या फिर्यादीनुसार रामनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
व्यवसायाने कार चालक असलेले गणेश इदाते हे आपल्या कुटुंबीयांसह पश्चिम डोंबिवलीतील टेल्कोसवाडीमध्ये असलेल्या राहुल निवास इमारतीत राहतात. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने तक्रारदार गणेश इदाते आपल्या दुचाकीवर पत्नी आणि लहान मुलाला घेऊन खरेदीसाठी डोंबिवलीच्या बापूसाहेब फडके रोडला आले होते. खरेदी झाल्यानंतर ते फडके रोडने बाजीप्रभू चौकातून घरी निघाले होते. या चौकात रस्त्याच्या मध्यभागी रिक्षावाला शिवम पवार याने वाहतुकीला अडथळा होईल अशा पध्दतीने रिक्षा उभी केली होती. त्याच्या रिक्षामुळे इतर मोठी वाहने पुढे जाऊ शकत नव्हती.
शिवम पवार याच्या रिक्षामुळे अडथळा झाल्याने गणेश इदाते यांनी त्याला रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले. याचा राग आल्याने शिवमने शिवागाळ करून तू मला सांगणारा कोण ? असा जाब विचारत गणेश यांच्याशी वाद घातला. त्यानंतर रिक्षावाल्या शिवम पवार याने पत्नी आणि लहान मुलासमक्ष ठोसा-बुक्क्यांनी मारहाण करून रस्त्यावर पडलेला पेव्हर ब्लाॅकचा उचलून गणेश इदाते यांच्या डोक्यात घातला. यात गणेश यांच्या कपाळाला दुखापत झाली. पुन्हा आपल्याशी पंगा घेतल्यास जीवे मारण्याचीही धमकी देऊन रिक्षावाल्याने तेथून पळ काढला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
कल्याण-डोंबिवलीमध्ये रस्ते अडवून प्रवासी वाहतूक करणाऱ्या सात-आठ रिक्षावाल्यांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जात आहेत. दर आठवड्याला असे प्रकार घडत असतात. मात्र तरीही रिक्षावाले काहीकेल्या ऐकत नसल्याने प्रवाशांसह पोलिसही त्रस्त झाले आहेत. अशा बेजबाबदार रिक्षावाल्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.