Dombivli Water Shortage Pudhari
ठाणे

Dombivli Water Shortage: निवडणूक संपताच डोंबिवलीत पाणीटंचाई

पी अँड टी कॉलनीत अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा; प्रश्न न सुटल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील पी ॲन्ड टी कॉलनी परिसरात पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नसल्याने या भागातील संतप्त रहिवाशांनी शुक्रवारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कल्याणमधील मुख्यालयावर मोर्चा काढून पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. निवडनुकीच्या काळात या भागात पाणीपुरवठा नियमित होत होता. मात्र निवडणूक झाल्यानंतर म्हणजेच गेल्या महिनाभरापासून पाणी येत नसल्याने खासगी टँकरचे पाणी विकत घेऊन आम्हाला पाण्याची गरज भागवावी लागत असल्याच्या तक्रारी मोर्चेकरांनी केल्या.

पी ॲन्डी टी कॉलनी भागातील संजयनगर, गणेशनगर भागात चाळी, इमारती आहेत. नवीन इमारतींची कामे या भागात सुरू आहेत. रुग्णालये, काही वाणिज्य संस्था या भागात आहेत. या सर्व संस्थांना पुरेशा दाबाने पाणी येते. मात्र या भागातील रहिवाशांच्या घरात पिण्यासाठी पुरेल इतके पाणी येत नाही. केडीएमसी आणि एमआयडीसीचे अधिकारी पाणी टंचाईच्या विषयाकडे गांभीर्याने पाहत नाहीत. त्यामुळे रहिवाशांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या मनीषा राणे यांनी सांगितले. या भागातील पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी केडीएमसीचे अधिकारी इकडचे पाणी तिकडे आणि तिकडचे पाणी इकडे वळवून लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप राणे यांनी केला.

...अन्यथा बेमुदत उपोषण

केडीएमसी आणि एमआयडीसीकडे सतत पाठपुरावा करूनही पी ॲन्डी टी कॉलनी परिसराचा पाणी प्रश्न सोडविला जात नाही. त्यामुळे आम्ही पालिका आयुक्तांचे या गंभीर विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी केडीएमसीच्या कल्याण मुख्यालयावर मोर्चा काढणे भाग पडल्याचे मोर्चेकरांनी सांगितले. हा प्रश्न मोर्चा काढूनही सुटला नाही तर मात्र याच ठिकाणी बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला. अनेक महिलांनी मोर्चात सहभागी होण्यासाठी सुट्टी घेतली होती. या मोर्चात महिला, पुरूष, ज्येष्ठ नागरिक अधिक संख्येने सहभागी झाले होते.

विक्रीसाठी आहे...रहिवाशांसाठी नाही

पी ॲन्ड टी कॉलनी परिसरातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तीन वर्षांपूर्वी मानपाडा रोडला असलेल्या सांगाव येथील श्रीक्षेत्र पिंपळेश्वर महादेव मंदिराजवळ विशेष पाणी पुरवठ्याची योजना राबविण्यात आली. मात्र हे पाणी आता पुरेशा दाबाने येत नाही. या ठिकाणाहून केडीएमसीचे टँकर पाणी भरून शहराच्या भागात विक्रीसाठी नेतात. केडीएमसीकडे विक्रीसाठी पाणी आहे. मात्र रहिवाशांसाठी पाणी नाही. केडीएमसी आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा या सर्व गोष्टीला कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप मनिषा राणे यांनी यावेळी बोलताना केला.

एमआयडीसीकडूनही अपुरा पुरवठा

गेल्या महिन्यापासून पुरेशा दाबाने पाणी येत नसल्याने नोकरदार महिलांचे सर्वाधिक हाल होत आहेत. सकाळी शाळकरी मुलांसह नोकरदार वर्गाला घरातून वेळेत बाहेर पडणे आवश्यक असते. घरात पाणी नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. सोसायटीला पाणी येण्यासाठी काही नोकरदार मंडळी कार्यालयात सुट्टी घेऊन विकतचे पाणी मिळविण्यासाठी धावाधाव करतात. पी ॲन्डी टी कॉलनी भागात पाण्याची टंचाई असल्याचे माहिती असूनही हा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी केडीएमसीचे अधिकारी प्रयत्न करत नाहीत. बघू...करू...थोडे दिवस हा प्रश्न आहे, अशी तकलादू कारणे सांगतात. एमआयडीसीचे अधिकारी पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करत नाहीत. त्यामुळे ही टंचाई निर्माण होत आहे, असे या भागातील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्त्या मनीषा राणे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT