डोंबिवली : स्टेशन परिसरात शॉर्मा विकणाऱ्या एका डोंबिवलीकर मराठी तरूणीच्या हातगाडीवर डूख धरून वारंवार कारवाई केली जाते. अखेर या तरूणीने संतापाच्या भरात व्हिडिओ तयार करून तो समाज माध्यमांवर व्हायरल केला होता. व्हायरल झालेला हा व्हिडिओ थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत जाऊन पोहोचला. राज ठाकरे यांनी या व्हिडिओची शहानिशा करून जातीने लक्ष घालण्याच्या सूचना करताच मनसेचे युवा नेते अविनाश जाधव थेट डोंबिवलीत पोहोचले आणि संबंधित तरूणीची व्यथा जाणून घेतली. तळपायाची आग मस्तकात जाईल, असा प्रसंग या तरूणावर बेतल्याने डोंबिवलीत मराठी विरूद्ध परप्रांतीयांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
डोंबिवलीकर शॉर्मा विक्रेत्या एकता सावंत हिने तिची व्यथा व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केल्यानंतर या प्रकाराची दखल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली. शुक्रवारी रात्री मनसेचे पदाधिकारी आणि अविनाश जाधव यांनी एकताची भेट घेतली. यावेळी एकता सावंत हिने तिच्यावर बेतलेल्या प्रसंगाची इत्यंभूत माहिती उघड केली.
रेल्वे स्टेशनच्या १५० मीटर परिघात फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते. अनेक परप्रांतीय येथे व्यवसाय करत असतानाही फक्त माझ्याच दुकानावर कारवाई केली जाते. मी दररोजचे ३०० रूपये देते, तरीही केडीएमसीकडून माझी गाडी उचलली जाते. मी दोन वर्षांपासून येथे स्ट्रगल करते. नवरात्रौत्सव, दिवाळी, गणपती सणांच्या वेळी स्टॉल बंद करते. पोलिस आणि केडीएमसीवाले येऊन पैसे घेऊन जातात आणि वर मलाच विचारतात की तुला येथे स्टॉल लावायला परवानगी मिळाली आहे का ? अशी आपबिती एकताने मनसेचे नेते अविनाश जाधव यांना सांगितली.
राज ठाकरेंनीच मला पाठवले : आता रडायचे नाही
एकता तिच्यावर बेतलेल्या प्रसंगांची करूण कहाणी कथन करताना म्हणाली, माझी एकच विनंती आहे की परप्रांतीयांना, दिव्यांगांना टपरी मिळते ना ? मग मलाही येथे टपरी टाकून द्या. त्या टपरीवर राज ठाकरेंचा फोटो लावून द्या. यावर जाधव म्हणाले की टपरी टाक, बाकी मी बघतो. काही अडचण आली तर इथे आपले पदाधिकारी आहे, यापेक्षाही अडचण आली तर मी स्वतः येईन. बाकी आयुक्तांशी साहेब बोलतील, असे आश्वासन अविनाश जाधव यांनी एकताला दिले. आता रडायचे नाही, रडून व्हिडिओ करायचे नाहीत. मराठी माणूस कधी रडत नाही. काही अडचण आली तर आपले पदाधिकारी आहेत, नाहीतर मला फोन करायचा, मी ठाण्यातून अर्ध्या तासांत येईन. पण यापुढे तुझा एकही रडतानाचा व्हिडिओ आला नाही पाहिजे, असा दिलासाही जाधव यांनी एकताला दिला.
रेल्वे स्टेशनच्या १५० मिटर परिघातील फेरीवाल्यांचे समूळ उच्चाटन करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचा दाखला देत माजी आमदार तथा मनसेचे नेते राजू पाटील यांनी मध्यंतरी आक्रमक पावित्रा घेतला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशांची पायमल्ली करणारा कुणीही अधिकारी, फेरीवाला वा त्यांना पाठीशी घालणारा हप्तेखोर दलाल जरी असला तरी त्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना राजू पाटील यांनी पोलिसांचे लक्ष वेधताना दिल्या होत्या.
पोलिसांकडून या संदर्भात गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याने अडचणीत येण्याआधीच केडीएमसीच्या अधिकाऱ्यांनी डोंबिवलीच्या वादग्रस्त उर्सेकर वाडीसह स्टेशन परिसरातील अतिक्रमणांचा चुराडा केला. केडीएमसीच्या आक्रमक पावित्र्यामुळे उर्सेकर वाडीतील परप्रांतीय फेरीवाल्यांनी शहराबाहेर पळ काढला आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसर परप्रांतीय फेरीवाल्यांपासून मुक्त होऊ शकेल, अशा प्रतिक्रिया डोंबिवलीकरांकडून समाज माध्यमांवर उमटत आहेत.