Dombivli bridge stunt action Pudhari
ठाणे

Dombivli bridge stunt action: डोंबिवलीतील मोठागाव-माणकोली पुलावर जीवघेणे स्टंट; पोलिसांची धडक कारवाई, 5 जणांवर गुन्हे

मध्यरात्री रेसकोर्स बनलेल्या उड्डाण पुलावर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई; स्टंटबाजांना पोलिसांचा कडक इशारा

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : डोंबिवली-भिवंडीला जोडणाऱ्या मोठागाव-माणकोली खाडीवरील उड्डाण पुलावर रात्रीच्या सुमारास जीवघेणे स्टंट सुरू झाले आहेत. कार आणि दुचाक्यांवर चालणाऱ्या अशा स्टंटबाजांमुळे स्वतःसह पुलावरून ये-जा करणाऱ्या प्रवासी आणि पादचाऱ्यांच्या जीवाला धोका वाढला आहे. अशा स्तंटबाजांच्या जीवघेण्या रेसकोर्सला डोंबिवलीच्या विष्णूनगर आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी फुलस्टॉप दिला आहे. मोटार वाहन कायद्यासह फौजदारी कायद्यांचा वापर करून पोलिसांनी 5 स्टंटबाजांवर आक्रमक कारवाई केली आहे.

दिवसभर वाहनांनी गजबजलेला हा पूल मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत सुनासुना असतो. या कालावधीत डोंबिवलीसह भिवंडीतील अनेक टवाळखोर हातात दारूच्या बाटल्या मिरवत चखणा घेऊन दुचाक्या आणि कारने पुलावर येतात. यातील अनेक बदमाश पुलाच्या कठड्यांवर बसून बिनधास्तपणे ओल्या पार्ट्या झोडताना आढळून येतात. गांजा भरलेल्या सिगारेटचे झुरके हवेत सोडत या भागात रात्रभर फिरत असतात. हा पूल जणुकाही स्टंटबाजांसाठी रेसकोर्स बनल्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर तुफान व्हायरल झाले होते. पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, डोंबिवली विभागाचे सहाय्यक आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णूनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम चोपडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत मोरे, सचिन लोखंडे, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीराम पाटील, तसेच विष्णूनगर आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी रात्री या पुलावर फिल्डिंग लावली होती.

उड्डाण पुलावर भरधाव वेगात वाहने चालवून स्टंटबाजी करणाऱ्यांचे व्हिडिओ या आधीच बारकाईने तपासले होते. त्यानुसार अचानक कारवाई सुरू करून पोलिसांनी शहर वाहतूक नियंत्रण पोलिसांच्या मदतीने एम एच 05/एफ जी/5656 या क्रमांकाच्या थार जिपचा चालक पीयूष द्वारकानाथ म्हात्रे (21) याच्यावर मोटार वाहन कायद्याचे कलम 100 (2) 177 प्रमाणे कारवाई करून त्याच्याकडून 1500 रूपये दंड, तसेच दंडाची थकबाकी 3500 रूपये वसूल केले. एम एम 05 /जी डी/0049 या क्रमांकाच्या होंडाई वेर्णा कारचा चालक वेदांत महेश सावंत (18) याच्यावर मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे कारवाई केली. एम एम 05/सी व्ही/ 3988 या स्कॉर्पिओ जिपमधून भरधाव वेगात रेसींग करणाऱ्या गाड्यांचे मोबाईलद्वारे व्हिडीओ शूट करणारा विशाल दिनेश विश्वकर्मा (22) आणि कृष्णा जितेंद्र विश्वकर्मा (19) या दोघांच्या विरोधात महाराष्ट्र पोलिस कायदा 1951 चे कलम 112/117 प्रमाणे कारवाई केली. तर एम एच 46/सी आर/ 4111 या स्कॉर्पिओ जिपचा चालक प्रदीप आंबादास ढाकणे (21) याच्यावर मोटार वाहन कायद्याचे कलम 184 प्रमाणे कारवाई करण्यात आली.

स्टंटबाजी केल्यास गाठ पोलिसांशी

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी स्टंटबाजी करणाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. मोठागाव-माणकोली खाडीवरील उड्डाण पुलावर कोणत्याही वेळी भरधाव वेगात कार, दुचाक्या वा तत्सम वाहने चालविल्यास अपघात घडून गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने असे प्रकार घडल्यास संबंधित वाहनांचे चालक स्वतः, तसेच इतरांच्या मृत्यूस कारणीभूत होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात असे प्रकार करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT