MNS Leader Raju Patil Social Media Post Pudhari
ठाणे

Raju Patil | हिंदुत्वाच्या नावावर उभा केलेला फेक एक्स फॅक्टर आता निष्प्रभ: राजू पाटील यांचा समाज माध्यमांवरून घणाघात

प्रचारातून प्रतिमा उभी करता येते पण विश्वास जबरदस्तीने मिळवता येत नाही

पुढारी वृत्तसेवा

MNS Leader Raju Patil Social Media Post

डोंबिवली : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना माजी आमदार तथा मनसेचे नेते राजू पाटील यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून केलेल्या एका सडेतोड पोस्टने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. हिंदुत्वाच्या नावावर उभा केलेला फेक एक्स फॅक्टर आता निष्प्रभ ठरताना दिसतोय अशी जहरी टीका त्यांनी आपल्या पोस्टमधून केली आहे.

जनतेच्या मनातील नाराजीच त्यांच्यासाठी सर्वात मोठा इशारा आहे. कारण प्रचारातून प्रतिमा उभी करता येते, पण जनतेचा विश्वास जबरदस्तीने मिळवता येत नाही, अशा शब्दांत राजू पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. त्यामुळे एका अपेक्षेने मतदान करणाऱ्या मतदारांच्या मनात त्यांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ती विश्वासार्हता आता शून्य झाली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

आता जनताच आपल्या कृतीतून आणि प्रश्नांतून त्यांचा हिशेब मागताना दिसतेय. खेळ संपला आहे, तरीही जाता जाता सवयीप्रमाणे जमतील तेवढे रडीचे डाव खेळले गेले तर आश्चर्य वाटायला नको, असा टोलाही पाटील यांनी आपल्या या पोस्टमधून लगावला आहे. पाटील यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून ही पोस्ट शेअर केली असून सध्या या पोस्टची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

राजू पाटलांचे झणझणीत अंजन

हिंदुत्व हे बाजारात विकायचे पोस्टर नाही, ते रक्तात भिनलेले संस्कार आहेत. प्रचारातून फोटो चमकवता येतो, पण जनतेच्या मनातील विश्वास फोटोशॉपने बनत नाही. ज्यांनी हिंदुत्वाला फक्त एक्स फॅक्टर समजले, त्यांचा फॅक्टर आज निष्प्रभ झाला आहे. कारण जनता आता घोषणा ऐकत नाही, तर हिशेब मागतेय. जिथे विश्वास शून्य होतो, तिथे रडीचे डाव सुरू होतात, हाच राजकारणाचा अंतिम अंक असतो, असे झणझणीत अंजन पाटील यांनी विरोधकांच्या डोळ्यांमध्ये घातले आहे. आता विरोधक यावर काय अभिप्राय नोंदवतात, याकडे समस्त राजसैनिकांच्या नजरा लागल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT