Dombivli Crime : केडीएमसीच्या वैद्यकीय विभागाचा बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा

बनेलीतील क्लिनिकवर छापा; बोगस डॉक्टर शिवकुमार सिंगवर गुन्हा दाखल
fake doctor
fake doctorpudhari photo
Published on: 
Updated on: 

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट रोखण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने शोधमोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत बनेली येथील एका बोगस डॉक्टरावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवकुमार सिंग असे या आरोपीचे नाव असून, त्याने बनेली गावात ‘आशीर्वाद क्लिनिक’ नावाने दवाखाना सुरू केला होता.

महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाला प्रभाग (वॉर्ड) क्रमांक १९ मधील बनेली गावात शिवकुमार सिंग हा ‘आशीर्वाद क्लिनिक आणि न्यूट्रिशन सेंटर’ येथे बेकायदेशीररीत्या वैद्यकीय व्यवसाय करत असल्याची तक्रार मिळाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने वैद्यकीय आरोग्य विभागाच्या पथकाने कल्याण तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

शिवकुमार सिंग याच्याकडे इलेक्ट्रो-होमिओपॅथीची पदवी असून, अशी शैक्षणिक अर्हता असलेली कोणतीही व्यक्ती आपल्या नावापुढे 'डॉक्टर', 'वैद्य' किंवा तत्सम पदवी/संबोधन वापरू शकत नाही. तसेच महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या १९ ऑगस्ट २००० रोजीच्या शासन परिपत्रकानुसार, इलेक्ट्रोपॅथी व इलेक्ट्रो-होमिओपॅथी या मान्यताप्राप्त चिकित्सा पद्धती नाहीत; पर्यायाने त्यांची कोणत्याही वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी होऊ शकत नाही. त्यामुळे असे व्यवसाय करणारे अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिक ठरतात.

त्यानुसार डॉ. तृणाली महातेकर यांच्या पथकाने बोगस डॉक्टर शिवकुमार सिंग याच्यावर बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय केल्याप्रकरणी महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ च्या कलम ३३ आणि ३३ (अ) अन्वये कल्याण तालुका पोलीस ठाण्यात ३० सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सपना रामोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news