डोंबिवली: 'डोंबिवलीच्या मिलापनगर तलावाचे पाणी पुन्हा खराब:जलचरांचे जीवन धोक्याच्या उंबरठ्यावर : प्रशासनाकडून उपाययोजनांना मुहूर्तच नाही' या मथळ्याखाली दैनिक पुढारीने १७ जुलैच्या अंकात सचित्र वृत्त प्रसारित केले होते. या वृत्ताची कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने तत्काळ दखल घेतली असून मिलापनगर तलाव केडीएमसीकडून साफ करण्यात आला आहे.
केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळपासून साफसफाईचे काम हाती घेतले.
दुपारपर्यंत या तलावातील निर्माल्य, कचरा, प्लास्टिक काढून टाकण्यात आले तसेच तलावाच्या परिसरात जमलेला कचरा, प्लास्टिक जमा करून टाकण्यात आले. यावेळी जवळपास अख्खी घंटागाडी भरेल इतका कचरा संकलित करण्यात आला आहे.
मिलापनगर तलाव डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागाचे वैभव आहे. जिवंत झरे असलेल्या या तलावातील पाणी एकदा खराब झाल्यामुळे तलावाला उकिरड्याचे स्वरूप आले असून जलचरांच्या जीवनाला धोका निर्माण झाला आहे. जून महिन्यात याच तलावात ४०० हून अधिक मासे मृत्युमुखी पडले होते.
जलचरांच्या मृत्यू घटनेनंतर केडीएमसीने केलेल्या तात्पुरत्या
उपाययोजना आता फोल ठरल्या असून तलावातून दुर्गंधी येऊ लागल्याने जलचरांना धोका निर्माण झाल्याचे सचित्र वृत्त दैनिक पुढारीने प्रसारित केले होते. या वृत्ताची केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी गंभीर दखल घेऊन तलावासह परिसराची स्वच्छ्ता केली.
तलाव आणि बाहेरील परिसर झाडून साफ करण्यात आला आहे. सामाजिक समस्यांना तोंड देणाऱ्या कल्याण-डोंबिवलीकरांच्या भावनांचा नेहमीच आदर केला जातो, अशा शब्दांत तलाव परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी दैनिक पुढारीचे आभार मानले.
कचरा फेकणाऱ्या अज्ञातांना आवाहन
स्थानिक रहिवाशांसह पर्यावरणप्रेमींनी केलेल्या एकूण ६ मागण्यांची अद्याप पूर्तता केली नसल्याने भविष्यात या तलावाची स्वच्छता अशीच कायमस्वरूपी राहील का? याबद्दल येथील रहिवासी साशंक आहेत.
केडीएमसीने लवकरच तलाव स्वच्छता ठेवण्यासंदर्भात ज्या मागण्या केल्या आहेत. त्याची पूर्तता करावी. तसेच ज्या अज्ञातांकडून निर्माल्य आणि कचरा टाकला जातो, त्यांच्यावर कडक कारवाई करावी.
चोरून, लपून निर्माल्यासह प्लास्टिक आणि कचरा फेकणाऱ्यांनीही तलावाची स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन या भागातील जागरूक रहिवासी तथा पर्यावरणप्रेमी राजू नलावडे यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना केले.