Dombivli MIDC Tree Safety Inspection
डोंबिवली : स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर शनिवारी भल्या सकाळीच डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागामध्ये वीज पुरवठा खंडित झाला आणि झाड कोसळल्याची घटनाही घडली. दोन्ही घटना एकाच वेळी घडल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळी सहा ते सव्वा सातच्या सुमारास एमआयडीसीच्या निवासी विभागामध्ये पोलवर तांत्रिक बिघाड झाल्याने संपूर्ण परिसराचा वीज पुरवठा अचानक बंद झाला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने दुरूस्तीचे काम हाती घेतले. सुमारे सव्वा तासानंतर वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला. अनेक ठिकाणी १५ ऑगस्ट निमित्ताने ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याने बत्ती गुल झाल्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण होते. वीज सुरळीत झाल्यावर रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
वीज सुरळीत झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच सकाळी साडेसातच्या सुमारास निवासी विभागातील चिंतामणी सोसायटी समोर एक मोठे गुलमोहराचे झाड रस्त्यावर कोसळले. सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर कोणतीही व्यक्ती किंवा वाहन जात नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी झाड तोडून ते रस्त्याच्या कडेला बाजूला केले. त्यामुळे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.
केडीएमसी आणि एमआयडीसी प्रशासनाने निवासी परिसरातील विशेषतः गुलमोहर आणि इतर जुनी धोकादायक झाडांची तातडीने तपासणी करावी. जी झाडे कोसळण्याच्या स्थितीत आहेत अशी झाडे तोडून घ्यावीत. जेणेकरून भविष्यात कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी टळेल, असे या भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी सांगितले.
झाडे कोसळण्याची मालिका
एमआयडीसीच्या निवासी विभागामध्ये यंदाच्या पावसाळ्यात झाडे कोसळण्याची मालिका सुरू आहे. आतापर्यंत जवळपास १७ झाडे पडल्याची माहिती आहे. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसीच्या उद्यान विभागाने झाडे कोसळण्याच्या घटनांची कारणे शोधण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. या समितीकडून अहवाल तयार करून तो लवकरच केडीएमसी आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे.