कल्याण: डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान आणि प्रोबेस रासायनिक कारखान्यांमध्ये झालेल्या भीषण स्फोटांच्या पार्श्वभूमीवर येथील अतिधोकादायक व धोकादायक रासायनिक उद्योगांचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दिली. यासंदर्भातील प्रश्न आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला होता.
उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितले की, २८ मे २०२४ रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली कृती आराखडा समिती स्थापन करण्यात आली.
त्यानंतर ३१ मे २०२४ रोजी समितीच्या बैठकीत डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील अतिधोकादायक आणि धोकादायक रासायनिक उद्योगांचे उत्पादन स्थलांतरित करणे तसेच विनापरवाना कारखान्यांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र सर्वेक्षण समितीची स्थापना करण्यात आली. समितीने औद्योगिक क्षेत्रात प्रत्यक्ष पाहणी करून उद्योगांचे सर्वेक्षण केले.
या सर्वेक्षणादरम्यान धोकादायक आणि अतिधोकादायक उद्योगांची वर्गवारी करण्यात आली. काही भूखंडधारकांनी रासायनिक उत्पादनाऐवजी माहिती तंत्रज्ञान (आयटी) वापरासाठी परवानगी घेतली असून संबंधित भूखंडांवरील रासायनिक उद्योग बंद करण्यात आल्याची माहितीही सरकारने दिली.
डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील धोकादायक उद्योगांच्या स्थलांतराची प्रक्रिया सध्या सुरू असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. दरम्यान, उद्योगांच्या स्थलांतराबाबत कामा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र साशंकता व्यक्त केली आहे.
संघटनेचे पदाधिकारी देवेन सोनी यांनी सांगितले की, उद्योग स्थलांतराबाबत त्यांना अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. अमुदान कारखान्यातील स्फोटानंतर उद्योगमंत्र्यांनी अंबरनाथ एमआयडीसी जवळील पाले परिसरात उद्योग स्थलांतरित करण्याबाबत संकेत दिले होते.
मात्र, संबंधित परिसर हा इंजिनिअरिंग झोन असून रासायनिक उद्योगांसाठी राखीव झोन नाही, हा मुद्दा त्यावेळीच कामा संघटनेने शासनाच्या निदर्शनास आणून दिल्याचे त्यांनी सांगितले.
डोंबिवली एमआयडीसीतील धोकादायक रासायनिक उद्योगांचे स्थलांतर हा स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेशी निगडित महत्त्वाचा विषय असून, त्यासाठी सरकार कार्यवाही काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले.