Dombivli murder : डोंबिवलीत नळ चालू ठेवल्याचा जाब विचारल्याने हत्या File Photo
ठाणे

Dombivli murder : डोंबिवलीत नळ चालू ठेवल्याचा जाब विचारल्याने हत्या

घटनेमुळे पश्चिम डोंबिवलीतील कोपर परिसरात एकच खळबळ माजली असून पोलिसांनी खुन्याला तात्काळ अटक केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : डोंबिवलीमध्ये किरकोळ वादातून एका सुरक्षारक्षकाची निघृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नळ चालू ठेवून पाणी वाया का घालवतोस ? असा जाब विचारल्याच्या कारणातून संतप्त झालेल्या तरूणाने सुरक्षारक्षकावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुरक्षारक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे पश्चिम डोंबिवलीतील कोपर परिसरात एकच खळबळ माजली असून पोलिसांनी खुन्याला तात्काळ अटक केली आहे.

या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम डोंबिवलीतील कोपर परिसरात असलेल्या अण्णाभाऊ साठेनगरमध्ये ही घटना मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास घडली आहे. सद्या पाण्याचे सर्वत्र दुर्भिक्ष सुरू आहे. जेमतेम पाण्यावर रहिवाशांना आपली तहान भागवावी लागते. त्यातच अण्णाभाऊ साठेनगरात हंडाभर पाण्यासाठी तेथील रहिवाश्यांना सार्वजनिक नळावर कसरत करावी लागते. तेथील सुरक्षारक्षक उमेश वाघ (35) याने परिसरात नळ चालू ठेवून पाणी वाया घालवण्याबाबत अक्षय जाधव (30) याला जाब विचारला. यावरून दोघांमध्ये वाद झाला.

हा वाद इतका वाढला की संतप्त झालेल्या अक्षय जाधवने उमेश वाघ याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात उमेश वाघ गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या उमेशला पाहून हल्लेखोर अक्षय याने तेथून पळ काढला. परिसरातील रहिवाशांनी जखमी अवस्थेत पडलेल्या सुरक्षारक्षक उमेश याला तातडीने केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी तपासून घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच विष्णूनगर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. खूनाचा गुन्हा नोंदवून वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम चोपडे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक गहिनीनाथ गमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास चक्रांना वेग दिला. अवघ्या काही तासांच्या आत पोलिसांनी आरोपी अक्षय जाधव याला ताब्यात घेऊन त्याच्यावर अटकेची कारवाई केली.

बुधवारी दुपारी आरोपी अक्षयला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 16 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेनंतर अण्णाभाऊ साठेनगर परिसरात काही काळ भितीचे वातावरण पसरले होते. मात्र पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT