Dombivli local train derailment Pudhari
ठाणे

Dombivli Local Train | तांत्रिक विभागाकडून युद्धपातळीवर काम; डोंबिवलीत विस्कळीत लोकल सेवा पूर्ववत सुरू

डोंबिवलीच्या फलाट क्रमांक एकवरून रिकामी लोकल रूळावरून जात असताना एक डबा रूळावरून उतरला

पुढारी वृत्तसेवा

Dombivli local train derailment

डोंबिवली : मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल सोमवारी (दि.२०) सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकात घसरल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकल सेवा काही काळ विस्कळीत झाल्यामुळे चाकरमानी प्रवाशांचे मोठे हाल झाले. आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने कामावर जाण्यासाठी निघालेल्या हजारो प्रवाशांना या तांत्रिक बिघाडांचा मोठा फटका बसला. रेल्वेच्या तांत्रिक विभागाने युद्धपातळीवर काम सुरू करून उतरलेला डबा रूळावर आणल्यानंतर लोकल सेवा पूर्ववत सुरू झाली.

कळवा कारशेडहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या रिकाम्या लोकल डबा डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ सकाळी ८ वाजून ९ मिनिटांच्या सुमारास घसरला. या घटनेमुळे मुंबईच्या दिशेकडे निघालेल्या तीन लोकल गाड्यांची वाहतूक थांबविण्यात आली होती. या घटनेमुळे कल्याण, कर्जत, कसारा येथून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या प्रवासांचे हाल झाले. ऐन सोमवारी सकाळी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी हा प्रकार घडल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात आला.

मुंबईच्या दिशेने निघालेल्या रेल्वेगाड्यांची वाहतूक तब्बल अर्धा तास उशीराने सुरू होती. त्यामुळे रेल्वे फलाटांवरही गर्दी झाली होती. तर काही लोकल रूळांवर उभ्या होत्या. नेमका काय प्रकार झाला ? याबाबत रेल्वेतील प्रवाशांना पुरेशी माहिती मिळत नव्हती. त्यामुळे प्रवाशांमध्ये चिंता निर्माण झाली होती. या प्रकारामुळे अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आले नाही. रेल्वेचा डबा रिकामा असल्याने कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. परंतु हा प्रकार नेमका कसा झाला याची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली जात आहे.

चाकरमानी प्रवाशांचे हाल

मध्य रेल्वेच्या मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी सोमवारची सकाळ मन:स्तापाची ठरली. कळवा कारशेडमधून निघालेल्या लोकलचा डबा रूळांवरून घसरल्यानंतर मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या रेल्वेगाड्यांचा खोळंबा झाला होता. या घटनेमुळे आठवड्याच्या पहिल्याचा दिवशी रेल्वेचे वेळापत्रक बिघडले. त्यामुळे कामावर निघालेल्या चाकरमानी प्रवाशांचे हाल झाले. डोंबिवलीच्या फलाट क्रमांक एकवरून रिकामी लोकल रूळावरून जात असताना एक डबा रूळावरून उतरला. सकाळी आणि गर्दीच्या वेळी रेल्वेच्या रूळावरून डबा घसरल्याने चाकरमान्यांची परवड झाली होती.

प्रवाशांची भर उन्हात पायपीट

डोंबिवलीहून कल्याणच्या दिशेने जाणारी डाऊन स्लो लोकल रूळावरून घसरली. या लोकलच्या एका डब्याने ट्रॅक सोडल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. डबा रूळावरून घसरल्याने डाऊन स्लो मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. परिणामी मागून येणाऱ्या लोकल गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. तर अनेक लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. भर उन्हात प्रवाशांना रेल्वे रूळांतून चालत जावे लागले. ही माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ सदर घसरलेला डबा रूळावर आण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले. काम पूर्ण होऊन रेल्वे सेवा सुरळीत करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT