Road Delay Pudhari
ठाणे

Road Delay: डोंबिवली-कोपर-मुंब्रा रेल्वे समांतर रस्त्याचा विसर; वचननाम्यातील रस्ता गेली 25 वर्षे कागदावरच

या रस्त्याला आणखी एक पर्याय म्हणून डोंबिवली-मुंब्रा रेल्वे समांतर रस्त्याची नितांत गरज आहे.

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली: ठाण्याच्या पल्याड असलेल्या कल्याण-डोंबिवलीची वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता रस्त्यांचे रुंदीकरण करूनही कल्याण-शिळ महामार्ग अपुरा पडत आहे. या महामार्गावर वाहतुकीचा प्रचंड ताण वाढून दररोजच वाहतूक कोंडी होत आहे. या रस्त्याला आणखी एक पर्याय म्हणून डोंबिवली-मुंब्रा रेल्वे समांतर रस्त्याची नितांत गरज आहे.

1999 सालात या रस्त्याची मागणी पुढे आली. त्यानंतर 2007 मध्ये सर्वेक्षण झाले. त्यानंतर अनेक नवीन रस्ते झाले. मात्र रेल्वे मार्गाला समांतर असणारा हा रस्ता दुर्लक्षितच राहिला, नव्हे तो गेली 25 वर्षे कागदावरच राहिला आहे. या रस्त्याचे भिजत घोंगडे कधी बाजूला करणार? याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

जिल्ह्याचे नागरिकीकरण झपाट्याने होत असून त्याचा सर्वाधिक ताण मध्य रेल्वेवर येत आहे. ठाण्याच्या पल्याड असलेल्या मुंब्रा, दिवा, कोपर, डोंबिवली, ठाकुर्ली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड आदी भागाला जोडणारा कल्याण-शिळ महामार्ग हा एकमेव रस्ता आहे.

या भागातील लोकसंख्या वाढली आहे. त्याबरोबरच वाहनांची संख्या देखील वाढली आहे. 2002 पर्यंत दुपदरी असणारा कल्याण-शिळ महामार्ग त्यानंतरच्या काळात चार पदरी करण्यात आला. मात्र या महामार्गावरील वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे या महामार्गावर कायम वाहतूक कोंडी होत आहे.

15 वर्षानंतर कल्याण-शिळ महामार्ग सहा पदरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र जमीन संपादन हा विषय वादाचा झाला. रस्त्याचे चार पदरी रुंदीकरण करताना घेतलेल्या जमिनीचा मोबदला जमीन मालकांना मिळाला नव्हता. पुन्हा सहा पदरीकरण करताना जमीन संपादित करण्यात येत होती. त्यामुळे जमीन मालकांनी विरोध करण्यास सुरुवात केली. परिणामी काही ठिकाणी सहापदरीकरण झाले, तर काही ठिकाणी रखडले आहे.

कल्याण-डोंबिवली-मुंब्रा रेल्वे समांतर रस्ता तयार करण्याची मागणी 1999 पासूनची आहे. आजही ठाण्याच्या पल्याड असलेल्या मुंब्रा, दिवा, कोपर, डोंबिवली, ठाकुर्ली, कल्याण व त्यापुढील परिसरातील नागरिकांना ठाणे वा मुंबईला जायचे असेल, तर रेल्वेशिवाय कोणताही पर्याय नाही.

सकाळी गर्दीच्या वेळेत कल्याणहून डोंबिवली असो किंवा ठाण्याला जायचे असेल तर लोकलमध्ये शिरणे कठीण असते. त्यामुळे वृद्ध, गरोदर महिला, रुग्ण किंवा विद्यार्थ्यांचे खूप हाल होत आहेत. तसेच अतिवृष्टी किंवा तांत्रिक कारणामुळे रेल्वेसेवा बंद पडल्यास सर्वच प्रवाशांचे हाल होत असतात.

26 जुलै 2005 च्या अतिवृष्टीवेळी रेल्वे मार्ग अनेक दिवस बंद होता. अनेकदा अतिवृष्टी व तांत्रिक कारणाने रेल्वे सेवा बंद झाल्यावर चार-चार दिवस लोकांचा जनसंपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. त्यामुळे डोंबिवली-कोपर-मुंब्रा हा रेल्वे लाईनला समांतर असा रस्ता होणे अत्यंत काळाची गरज आहे. तत्कालीन आ. हरिश्चंद्र पाटील यांनी या रस्त्यासाठी खूप पाठपुरावा केला.

त्यानंतर रेल्वे समांतर रस्त्याच्या कामाचे 2005 मध्ये सर्व्हेक्षण देखील केले होते. 2007 मध्ये एमएमआरडीएने रस्त्याचा डीपीआर तयार करण्यासाठी 93 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला. मात्र पर्यावरण विभागाच्या परवानग्या अभावी या रस्त्याचे भवितव्य अधांतरी सापडले. हा रस्ता झाल्यास डोंबिवली ते मुंब्रा हे अंतर वाहनाने अवघ्या 5 ते 7 मिनिटात गाठता येईल. या रस्त्यावरून मुंबई वा ठाणे ते डोंबिवली, कल्याण अशी थेट बससेवा सुरू होऊ शकेल. त्यामुळे रेल्वेवरील ताण कमी होण्यास मदत होऊ शकते.

वाहतुकीच्या गर्दीचे विकेंद्रीकरण

ठाणे जिल्ह्याला प्रथमच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री पद मिळाल्याने अनेक वर्षे रखडलेल्या डोंबिवली-मुंब्रा रेल्वे समांतर रस्ता मार्गी लागेल, अशी अपेक्षा होती. गेल्या 10-12 वर्षात जिल्ह्यात अनेक नवीन रस्ते झाले. मात्र अत्यंत महत्वाचा असा हा रस्ता कायम दुर्लक्षित राहिला.

भविष्यात कल्याण-शिळ महामार्ग संपूर्णपणे सहा पदरी झाला आणि मोठागाव-माणकोली हा नवीन रस्ता देखील सुरू झाला तरी कल्याण-शिळ महामार्गावरील वाहतुकीचा ताण फारसा कमी होणार नाही. वाहतुकीच्या गर्दीचे विकेंद्रीकरण करायचे असेल तर डोंबिवली-मुंब्रा हा रेल्वे समांतर रस्ता होणे काळाची गरज आहे.

लोकप्रतिनिधींकडून पाठपुराव्याच्या अपेक्षा

यापूर्वी झालेल्या अनेक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या वचननाम्यामध्ये शिवसेना-भाजपा युतीने रेल्वे समांतर रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दोन्ही सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक नेत्यांना, तसेच निवडून आलेल्या आमदार, खासदारांना त्याचा विसर पडला आहे.

माजी आमदार तथा मनसेचे नेते राजू पाटील यांच्यासह कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार राजेश मोरे यांनी देखील मागणी केली असली तरी गेली 25 वर्षे हा रस्ता केवळ कागदावरच राहिला हे स्पष्ट दिसत आहे. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून पाठपुराव्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. हा रस्ता वाहतुकीच्या गर्दीचे विकेंद्रीकरण करण्याची नांदी ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT