ह्युस्टन महाराष्ट्र मंडळ आयोजित विठ्ठल-रूक्मिणी मंदिराची आषाढी वारी यंदा तिसऱ्या वर्षात पदार्पण करताना अधिकच दैदिप्यमान ठरली. Pudhari
ठाणे

Ashadhi Wari | सातासमुद्रापार ह्युस्टनमध्ये भक्तिभावाचा महापूर : विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात तिसरी आषाढी वारी उत्साहात

ह्युस्टन महाराष्ट्र मंडळ आयोजित विठ्ठल-रूक्मिणी मंदिराची आषाढी वारी यंदा तिसऱ्या वर्षात पदार्पण

पुढारी वृत्तसेवा

Houston Vitthal Rukmini Temple Ashadhi Wari

डोंबिवली: सातासमुद्रापार अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील ह्युस्टनमध्येही आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीचा गजर झाला. ह्युस्टन महाराष्ट्र मंडळ आयोजित विठ्ठल-रूक्मिणी मंदिराची आषाढी वारी यंदा तिसऱ्या वर्षात पदार्पण करताना अधिकच दैदिप्यमान ठरली.

आषाढी एकादशी म्हणजे विठुरायाच्या भक्तीचा, हरिनामाच्या गजराचा आणि वारकरी परंपरेच्या अखंड श्रद्धेचा पवित्र उत्सव साजरा केला जातो. लाखो भाविक ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषात विठ्ठलनामात तल्लीन होतात. शनिवारी रोजनबर्ग येथून सकाळी साडेसहा वाजता ज्ञानोबा...तुकारामच्या जयघोषात वारीला सुरूवात झाली. उन्हाळी आणि दमट वातावरणातही सुमारे ४०० हून अधिक वारकऱ्यांनी साडेसहा मैलांची पायवारी पूर्ण केली.

आठ वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते ऐंशी वर्षांच्या थोरांपर्यंत सर्वांनी टाळ-मृदुंग आणि विणेच्या तालावर तीन तास विठूनामाचा गजर केला. वाटेत ठिकठिकाणी स्वयंसेवकांनी पाणी, ताक आणि केळींचे वाटप करून वारकऱ्यांची सेवा केली. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि संत गजानन महाराज यांच्या पालख्यांसोबत पताका, दंड आणि अब्दागिरी खांद्यावर घेऊन दिंड्या मार्गक्रमण करत होत्या.

मंदिरात भक्तीचा महापूर

विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात पोहोचताच वारीच्या उत्साहाला चौपट उधाण आले. ह्युस्टन महाराष्ट्र मंडळाच्या मोरया ढोल-ताशा पथकाने केलेल्या निनादात दैदिप्यमान रिंगण सोहळा पार पडला. महाआरतीच्या वेळी संपूर्ण मंदिर भक्तिरसाने ओतप्रोत भरून गेले. टाळ्या आणि टाळांच्या गजराने मंदिर परिसर दुमदुमला होता. महाप्रसाद म्हणून प्रफुल्ल, शिवानी आणि कु. अक्षता खारकर कुटुंबाने तयार केलेच्या रूचकर फराळाने वारकऱ्यांची सेवा करण्यात आली.

त्यामुळे वारीत सहभागी झालेल्या सर्वांची क्षुधा शांत झाली. असंख्य स्वयंसेवक, भक्त आणि पुजारी यांच्यातील देवत्वाचा अनुभव घेत, प्रत्येकाने स्वतःमधील माऊली जागवत हा सोहळा आनंदात पार पडला. आता सर्व वारकऱ्यांना पुढील कार्तिकी वारीचे वेध लागले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT