

सोलापूर : यंदाच्या आषाढी वारीत रेकॉर्ड ब्रेक ३२ लाख वारकरी आल्याची नोंद झाली. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून ही संख्या मोजली. पंढरपूरमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा चेहरा, कपड्याचा रंग, टोपी, फेटा, पगडी यांसारख्या वैशिष्ट्यांचा ताळमेळ लावून प्रत्येक वारकऱ्याची एक युनिक ओळख एआय मार्फत तयार करण्यात आली. त्यामुळे एकाच व्यक्तीची वारंवार होणारी मोजणी टाळली.
वारीमध्ये SentientLogics या तंत्रज्ञान संस्थेच्या मदतीने अत्याधुनिक Cognitive Visual Human Neural AI तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करण्यात आला. याआधारे दि. २४ ते २६ जुलै कालावधीत पंढरीत आलेल्या वारकऱ्यांची मोजणी करण्यात आली. त्यानुसार २४ जुलै रोजी सहा लाख ७५ हजार २७४ वारकरी, २५ जुलै रोजी १८ लाख ९६ हजार ५७३ वारकरी व २६ जुलै रोजी सहा लाख २६ हजार २८२ असे एकूण ३१ लाख ९८ हजार १२९ वारकऱ्यांनी पंढरपूरमध्ये प्रवेश केल्याचे दिसून आले. यामध्ये प्रामुख्याने २५ जुलै म्हणजे आषाढी एकादशी दिवशी सर्वात जास्त १८ लाख ९६ हजार ५७३ वारकरी आल्याचे दिसून आले. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांच्या नेतृत्वाखालील टीमने संपूर्ण कामगिरी पार पाडली.
अशी झाली अचूक मोजणी
पंढरपूर शहरामध्ये सरगम चौक ते इंदिरा गांधी चौक, तीन रस्ता ते दगडी पूल, गोपाळपूर पूल, सावरकर चौक व मिलिटरी हॉस्टेल, सांगोला चौक एन्ट्री या मार्गावर मुख्य AI कॅमेरे बसवण्यात आले होते. पंढरपूरमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा चेहरा, कपडांचा रंग आणि टोपी, पगडी यांसारख्या वैशिष्ट्यंचा या कॅमेऱ्याच्या मदतीने ताळमेळ लावून प्रत्येक वारकऱ्याची युनिक ओळख तयार करण्यात आली. त्यावरून त्यांची नोंदणी केली.