कल्याणातील कुटुंब साखर झोपेत असताना छत अंगावर कोसळूनही बचावले  (Pudhari File Photo)
ठाणे

Dombivli Shocking Incident | काळ आला होता...पण वेळ आली नव्हती

Roof Falls On Sleeping Family | साखर झोपेत असतानाच कुटुंबावर कोसळले घराचे छत

पुढारी वृत्तसेवा

House Roof Collapse Dombivli

डोंबिवली : काळ आला होता पण वेळ आली नव्हती, म्हणून तर कल्याणातील कुटुंब साखर झोपेत असताना छत अंगावर कोसळूनही बचावले आहे. कल्याण पूर्वेतील मंगल राघो नगर परिसरात असलेल्या गणेशनगर भागात एका घराचे जीर्ण झालेले छप्पर कोसळल्याची दुर्घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली.

नरेश रंगारे हे आपल्या कुटुंबियांसह दुर्वांकुर सोसायटीमध्ये वास्तव्यास आहेत. आपल्या कौलारू घरातील जीर्ण झालेले व वाळवी लागलेले वासे तुटल्याने घरावरील छत उंचावरून खाली जमिनीवर कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी घराचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

कुटुंबप्रमुख नरेश रंगारे यांनी त्यांची पत्नी व तीन लहान मुलांसह चाळीतील कौलारू घरात आपला कष्टाचा संसार थाटला आहे. शनिवारी रात्रीचे जेवण करून रंगारे कुटुंबीय उद्याच्या दिवशीच्या गप्पा रंगवत शांतपणे झोपी गेले. मात्र जीर्ण झालेल्या घराचे लाकडी वासे वाळवीमुळे कमकुवत होऊन डोक्यावर संकट म्हणून घोंघावत होते. रंगारे यांनी या अगोदरही वाश्याची तात्पुरती दुरुस्ती केली होती. रविवारी सकाळी सहाच्या सुमारास कमकुवत झालेल्या वाशांना भिजलेल्या कौलांचा भार सहन न झाल्याने घराचे छत कोसळून अंगावर आले.

नशीब बलवत्तर म्हणून या दुर्घटनेतुनही रंगारे कुटुंबीय सुखरूप बचावले. मात्र रंगारे यांच्या पत्नीच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली. योगायोगाने सर्दीमुळे बॅग डोक्यावर घेतल्याने लहान मुलगाही सुखरूप बचावला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक माजी नगरसेविका सुशीला माळी यांनी घटनास्थळी पोहोचून कुटुंबियांची भेट घेत त्यांना डागडुजीसाठी आर्थिक मदत करणार असल्याचे सांगितले. तसेच सदर घटनेचा तलाठी कार्यालया मार्फत आज सोमवारी पंचनामा केला जाणार असल्याचेही माळी यांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT