Dombivli Crime
डोंबिवली : कल्याण तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बल्याणी येथे राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीला नशेचे इंजेक्शन देऊन ड्रग्स, बिअर पाजून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी कल्याण तालुका पोलिस ठाण्यात ७ मे रोजी गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणातील ७ आरोपींपैकी एका आरोपीला १४ मे रोजी अटक केली होती. तर यातील इतर सहा आरोपी फरार होते. त्यापैकी शबनम शेख व झीनत कुरेशी या दोन महिलांना अटक करण्यात पोलिसांना तब्बल सव्वा महिन्यांनी यश आले आहे. शनिवारी अटक केल्यानंतर या दोघींना कल्याण न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
बहुचर्चित सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपीना अटक केली जात नसल्याच्या निषेधार्थ तालुका पोलिस ठाण्यावर सोमवारी मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा महिला मंडळातर्फे देण्यात आला होता. मात्र पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर सोमवारी निघणारा महिलांचा मोर्चा स्थगित करण्यात आला. तर उर्वरित अन्य चार आरोपींना अटक कधी करणार ? असा सवाल नागरिकांतून उपस्थित करण्यात येत आहे.
बल्याणीतील २१ वर्षीय तरूणीला तब्बल ३८ दिवस आंबिवली, तसेच कल्याणच्या रेस्ट हाऊसमध्ये डांबून तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते. या प्रकरणी पिडीत तरूणीची मैत्रीण झीनत कुरेशी, शबनम शेख, गुड्डू अब्दुल रहीम, गुलफाम अब्दुल रहीम, लियाकत शेख, अली इराणी या सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेने ठाणे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. गुन्हा दाखल होऊन आठवडा उलटला तरी आरोपी सापडत नसल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीबद्दल नागरिकांत उलट सुलट चर्चा सुरू होती.
सात आरोपींपैकी अली इराणीला सात दिवसांनंतर अटक करण्यात आली होती. तर सहा आरोपी फरार होते. त्यापैकी शबनम शेख व झीनत कुरेशी या दोन महिला आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. उर्वरित चार आरोपी अद्याप हाती लागले नसून पोलिस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास चक्रांना वेग दिला आहे.