Dombivli Gaming Zone Issue Pudhari
ठाणे

Dombivli Gaming Zone Issue: डोंबिवलीतील ऐतिहासिक 52 चाळ रेल्वे मैदानावरील गेमिंग झोनच्या कामाला स्थगिती

सर्वपक्षीयांनी केलेल्या आंदोलनाला यश; मैदान पुन्हा सर्वांसाठी खुले

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्तक्षेपामुळे, तसेच ग्रामीणचे आमदार राजेश मोरे आणि मनसेचे डोंबिवली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांच्या आक्रमक पावित्र्यामुळे पश्चिम डोंबिवलीच्या 52 चाळ रेल्वे मैदानावरील गेमिंग झोनचे काम तातडीने थांबविण्यात आले.

सर्वपक्षीयांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला असून मैदान पुन्हा खेळाडू, ज्येष्ठ नागरिक व स्थानिकांसाठी खुले झाले आहे. मनसेचे स्थानिक नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांनीही या मैदानाच्या जतनासाठी रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून भूमिका मांडली होती. या साऱ्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

पश्चिमेतील हजारो नागरिक, खेळाडू आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हक्काचे असे ऐतिहासिक 52 चाळ रेल्वे मैदान सध्या वाचले असून मैदानावरील सुरू असलेले गेमिंग झोन उभारण्याचे काम तातडीने थांबविण्यात आले आहे.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे आणि आमदार राजेश मोरे यांच्यासह मनसेचे स्थानिक नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांनी रेल्वे प्रशासनाकडे घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

52 चाळ परिसरातील रेल्वेच्या मालकीच्या या विस्तीर्ण मैदानावर रेल्वे प्रशासनाकडून गेमिंग झोन उभारण्याच्या दृष्टीने काही कामे सुरू करण्यात आली होती. या कामामुळे परिसरातील एकमेव मोठे खुले मैदान नष्ट होण्याची भीती निर्माण झाली होती.

अनेक वर्षांपासून या मैदानावर स्थानिक खेळाडू सराव करत आहेत. परिसरातील रहिवासी सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी येतात. ज्येष्ठ नागरिक येथे वेळ घालवतात. तसेच विविध सामाजिक आणि क्रीडा उपक्रमांचे हे प्रमुख केंद्र राहिले आहे.

मैदानाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्यानंतर मनसेचे स्थानिक नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक रहिवासी, खेळाडू, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन छेडले होते.

या पार्श्वभूमीवर मनसेचे ज्येष्ठ नेते तथा नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांनी रविवारी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांचे पत्राद्वारे लक्ष वेधले. या मैदानाचे व्यापारीकरण टाळावे आणि ते खेळाडूंसाठी पूर्ववत खुले ठेवावे, अशी ठाम मागणी करताना विकास आराखड्यात हे मैदान खेळाचे म्हणून आरक्षित असल्याकडे प्रल्हाद म्हात्रे यांनी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

या सर्वपक्षीय आंदोलनाची दखल घेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तत्काळ हस्तक्षेप करत संपूर्ण विषय गांभीर्याने हाताळण्याचे निर्देश दिले. त्यासाठी आमदार राजेश मोरे व स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर यांना रेल्वे प्रशासनाशी जाऊन चर्चा करण्याच्या सूचना दिल्या. आमदार मोरे आणि दरेकर यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची प्रत्यक्ष भेट घेऊन नागरिकांच्या भावना आणि मैदानाचे महत्त्व याबाबत सविस्तर चर्चा केली.

पश्चिम डोंबिवलीत नागरीकरणाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला असून मुलांसह खेळाडूंसाठी मोकळ्या जागांची कमतरता भासत आहे. अशा परिस्थितीत हे मैदान जपणे अत्यंत आवश्यक असल्याची ठाम भूमिका शिष्टमंडळाने रेल्वे प्रशासनासमोर मांडली. याची सकारात्मक दखल घेत रेल्वे प्रशासनाने सध्या सुरू असलेले काम तातडीने थांबविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हे मैदान पुन्हा एकदा नागरिकांसाठी खुले झाले असून खेळाडू, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

मैदानावरील संकट टळले

डोंबिवलीच्या क्रीडा संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेले हे मैदान केवळ मोकळी जागा नसून अनेक पिढ्यांच्या आठवणी, असंख्य खेळाडूंची स्वप्ने आणि परिसराच्या सामाजिक जीवनाचा केंद्रबिंदू आहे. मैदानाचे अस्तित्व टिकविण्या साठी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावनांना न्याय मिळाल्याची भावना आता परिसरात व्यक्त होत आहे.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा प्रभावी हस्तक्षेप आणि आमदार राजेश मोरे यांच्यासह मनसेचे स्थानिक नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे सध्या तरी 52 चाळ रेल्वे मैदानावरील संकट टळले आहे. मैदान वाचविण्यासाठी एकजुटीने उभे राहिलेल्या सर्व नागरिक, खेळाडू, ज्येष्ठ नागरिकांकडून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे आणि मनसेचे डोंबिवली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

लवकरच रेल्वे मंत्र्यांबरोबर बैठक

विशेष म्हणजे, हा विषय केवळ सध्याच्या कामांपुरता मर्यादित न ठेवता भविष्यातही मैदानाचे अस्तित्व कायम रहावे, यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे स्वतः पुढाकार घेत आहेत. यासंदर्भात ते लवकरच दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेणार असून 52 चाळ रेल्वे मैदान कायमस्वरूपी जतन करण्याबाबत आणि त्याचा क्रीडा व सार्वजनिक हितासाठी विकास करण्याबाबत सकारात्मक निर्णय व्हावा, यासाठी ते प्रयत्न करणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT