CCTV Camera: केडीएमसी हद्दीत स्मार्ट सिटीचे 30 टक्के सीसीटीव्ही बंद

पोलिसांच्या पत्रांना केराची टोपली
CCTV Camera
CCTV CameraPudhari
Published on
Updated on

डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत स्मार्ट सिटी अंतर्गत बसवण्यात आलेले 30 टक्के सीसीटीव्ही कॅमेरे देखभाल/दुरूस्तीअभावी बंद पडले आहेत. गुन्हे उघडकीस आणण्यासाठी महत्त्वाचे ठरणारे कॅमेरे नादुरुस्त असल्याने कल्याण-डोंबिवलीकरांची सुरक्षितता वाऱ्यावर पडली आहे. पोलिसांनी वारंवार पत्रांद्वारे लक्ष वेधूनही केडीएमसी प्रशासनाने दुरूस्तीकडे दुर्लक्ष केल्याने कल्याण-डोंबिवलीकरांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

कल्याण-डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत कल्याण-डोंबिवलीत मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये कोट्यवधी रूपये खर्चून सीसीटिव्ही कॅमेरे बसविले आहेत. तथापी हे कॅमेरे बंद पडल्याने घडणाऱ्या अप्रिय घटना, अपघात/दुर्घटनांसह गुन्ह्यांचा छडा लावण्यास अडथळे निर्माण होत आहे. हे कॅमेरे आता केवळ शोभेचे ठरत आहेत.

CCTV Camera
Dahanu Accident: डहाणूत कार अपघातात पाच जखमी; अचानक गुरे आल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले

गुन्हेगारीला आळा घालण्यासह वाहतूक नियंत्रणासाठी बसविण्यात आलेल्या एकूण कॅमेऱ्यांपैकी जवळपास 30 टक्के कॅमेरे गेल्या अनेक महिन्यांपासून देखभाल/दुरूस्तीअभावी बंद अवस्थेत आहेत. कल्याणात महात्मा फुले चौक, बाजारपेठ, खडकपाडा आणि कोळसेवाडी, तर डोंबिवलीत रामनगर, विष्णूनगर, टिळकनगर आणि मानपाडा अशी 8 पोलिस ठाणी आहेत.

या व्यतिरिक्त क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटसह कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण परिसरातील वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी 3 विभाग आहेत. या साऱ्यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झालेल्या गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासह किचकट गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी तांत्रिक मदत होत असते.

चोऱ्या, घरफोड्या, वाटमाऱ्या, चेन स्नॅचिंग, वाहनांच्या चोऱ्या, खून, हाणामाऱ्या यांसारख्या गुन्ह्यांचा छडा लावताना पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजचा मोठा आधार असतो. मात्र महत्त्वाच्या चौकांसह वर्दळीच्या ठिकाणचे व संवेदनशील परिसरातील अनेक कॅमेरे बंद असल्याने पोलिसांच्या तपासात अडथळे येत आहेत.

आरोपींची ओळख पटविणे व गुन्ह्याचा उलगडा करणे पोलिसांसाठी आव्हानात्मक बनले आहे. या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी पोलिसांनी केडीएमसीचे अनेक वेळा पत्रव्यवहारांद्वारे लक्ष वेधले आहे. बंद कॅमेरे तातडीने दुरूस्त करण्याची पोलिसांनी मागणी केली आहे.

सुरक्षित स्मार्टच्या घोषणा हवेत

स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही केवळ देखभाल/दुरूस्ती अभावी सुरक्षा वाऱ्यावर सोडली जात असल्याने कल्याण-डोंबिवलीकरांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पावसाळा तोंडावर आला असताना बंद कॅमेऱ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

परिणामी रात्रीच्या वेळी महिला व ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडणे धोक्याचे बनले आहे. शहर सुरक्षित व स्मार्ट बनवण्याच्या घोषणा हवेत विरल्याचा हा धडधडीत पुरावा आहे. कल्याण-डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत उभारण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणाच कोलमडली आहे.

logo
Pudhari News
pudhari.news