ठाणे

Dombivli Fire : डोंबिवलीत 'कैलास लस्सी'च्या किचनला भीषण आग; कर्मचाऱ्यांनी खिडकीतून उड्या मारत वाचवला जीव!

अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडे रेल्वे स्थानकालगत असलेल्या प्रसिद्ध 'कैलास लस्सी स्वीट मार्ट'च्या पहिल्या मजल्यावरील किचनला सोमवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागताच आत काम करणाऱ्या ७ ते ८ कर्मचाऱ्यांनी खिडकीतून बाहेर उड्या टाकून स्वतःचा जीव वाचवला. सुदैवाने, अग्निशमन दल वेळीच घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला.

ही घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. किचनमध्ये नेहमीप्रमाणे काम सुरू असताना अचानक धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कर्मचाऱ्यांनी तातडीने गॅस सिलेंडर बंद केले आणि खिडकीच्या मार्गाने बाहेर पडून स्वतःची सुटका केली. घटनेची माहिती मिळताच डोंबिवली अग्निशमन दलाचे जवान बंबांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून काही वेळातच आग आटोक्यात आणली.

प्राथमिक अंदाजानुसार, इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, मोठे आर्थिक नुकसानही टळल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, हे दुकान रेल्वे मार्गाला लागूनच असल्याने आगीचा धूर आणि ज्वाळा लोकलमधील प्रवाशांना स्पष्ट दिसत होत्या.

काही प्रवाशांनी या घटनेचे व्हिडिओ चित्रित करून सोशल मीडियावर शेअर केले. कर्मचाऱ्यांनी खिडकीतून उड्या मारून स्वतःचा जीव वाचवल्याचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या आगीमुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे परिस्थिती त्वरित नियंत्रणात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT