डोंबिवली: मी मोठा फायनान्सर आहे, एका फोनवर कोट्यवधींचे कर्ज मंजूर करून देतो, अशा थापा मारून अनेकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या डोंबिवलीतील निखिल भोईर या भामट्यास साथीदार राजा जोशी याच्यासह पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बाऊन्सरसह मिरवणाऱ्या या आरोपीने नामांकित बिल्डर, वकील आणि निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना कर्जाचे आमिष दाखवून कोट्यवधी रूपयांचा गंडा घातला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल याची काम करण्याची पद्धत अत्यंत शातीर होती. ज्यांना व्यवसायासाठी तातडीने मोठ्या रकमेची गरज आहे, अशा लोकांना तो आपल्या जाळ्यात ओढत असे.
या प्रकरणातील तक्रारदार देवानंद गंगाधर साळसकर (64, रा. मुलुंड, मुंबई) या बांधकाम व्यावसायिकाला 15 कोटी रुपयांच्या कर्जाची आवश्यकता होती. निखिलने त्यांना कर्ज मंजूर करून देण्याची 100 टक्के हमी दिली. मात्र त्यासाठी कर्जाच्या रकमेच्या सव्वा टक्के म्हणजेच सुमारे 18.75 लाख रूपये कमिशन आगाऊ द्यावे लागेल, अशी अट घातली.
कमिशनपोटी त्याने देवानंद साळसकर यांच्याकडून 16 लाख 69 हजार रूपये आगाऊ घेतले. विश्वास बसावा म्हणून निखिलने त्यांना 5 लाख रूपयांचा धनादेश दिला. मात्र काही दिवसांतच तो धनादेश बाऊन्स झाला. त्यानंतर त्यांना कर्जही दिले नाही आणि घेतलेले 16.69 लाख रूपयेही परत केले नाहीत. आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर साळसकर यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी या दोघांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 316 (2), 318 (4) अर्थात विश्वासघात व फसवणूक अन्वये गुन्हा दाखल केला आहे.वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम चोपडे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक गहिनीनाथ गमे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करीत तांत्रिक तपास आणि माहितीच्या आधारे सापळा रचून या दोघांना अटक केली आहे.
वरपर्यंत लागेबांधे सांगून मानसिक दबाव
निखिल भोईर लोकांना भेटताना नेहमी 4 ते 5 बाऊन्सर आणि शस्त्रधारी साथीदार सोबत ठेवत असे. मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये मिटिंग घेऊन माझे वरपर्यंत लागेबांधे आहेत, असे भासवून तो समोरच्यावर मानसिक दबाव निर्माण करायचा. याच खोट्या दराऱ्याला भुलून अनेक सुशिक्षित आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी त्याच्याकडे लाखो रूपये गमावले आहेत.
प्राथमिक तपासात केवळ बिल्डरच नव्हे, तर शहरातील काही वकील आणि निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांचीही त्याने अशाच पद्धतीने फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिस आता निखिलच्या बँक खात्यांचा, त्याचे वरपर्यंत असलेल्या लागेबांध्यांचा, त्याच्या बाऊन्सर तथा गनमॅनच्या टोळीचा आणि या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी फसवणुकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असून, नागरिकांनी अशा भामट्यांपासून सावध रहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.